
‘पुणे सार्वजनिक सभे’कडून अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ‘सार्वजनिक काका पुरस्कार’ प्रदान !*
*पुणे* प्रतिनिधी : ‘पुणे सार्वजनिक सभा’ या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या संघटनेकडून हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ज्येष्ठ विधीज्ञ नंदू फडके यांच्या हस्ते ‘सार्वजनिक काका पुरस्कार’ देण्यात आला. हिंदु धर्मावर विविध माध्यमातून होणार्या आघातांविरोधात कायदेशीर लढा देऊन हिंदुत्वाचे रक्षण करण्याचे व्यापक कार्य ते करत असल्याविषयी त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी पुणे सार्वजनिक सभेचे अध्यक्ष श्री. विद्याधर नारगोलकर, कार्यवाहक श्री. शरद गर्भे, कार्याध्यक्ष श्री. अनिल शिदोरे आणि अन्य पदाधिकारी, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांसह अनेक राष्ट्र-धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचा आरंभ दीपप्रज्ज्वलनाने झाला. त्यानंतर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात प्रतिवर्षीप्रमाणे काही होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक शिष्यवृत्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. अनिल शिदोरे यांनी पुणे सार्वजनिक सभेचा इतिहास सांगत संघटनेच्या कार्याची माहिती दिली. या वेळी ज्येष्ठ विधीज्ञ नंदू फडके अन् श्री. रमेश शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. श्री. विद्याधर नारगोलकर यांनी दोन्ही अधिवक्त्यांची वैशिष्ट्ये सांगत ‘पुणे सार्वजनिक सभेला पुढील काळात राष्ट्र-धर्माचे कार्य करतांना विधी साहाय्य लागल्यास दोन्ही अधिवक्ता कायम उभे रहातील’ असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शन आणि वन्दे मातरम् गायनाने झाला.



