vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वाहन तपासणी मोहीम पारदर्शक व कायद्यानुसार;उप प्रादेशिक परिवहन विभागाची माहिती अपघातांमध्ये 15.99 टक्क्यांनी घट

वाहन तपासणी मोहीम पारदर्शक व कायद्यानुसार;उप प्रादेशिक परिवहन विभागाची माहिती अपघातांमध्ये 15.99 टक्क्यांनी घट

बुलढाणा, प्रतिनिधी : उप प्रादेशिक परिवहन विभागामार्फत विशेष वाहन तपासणी मोहिमेसंदर्भांत प्रसिद्ध झालेल्या “बुलढाण्यात आरटीओचा ‘पुणेरी’ पॅटर्न!” या वृत्तातील आरोपांबाबत अधिकृत खुलासा करत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. संबंधित वृत्तातील अनेक दावे तथ्यहीन असून वाहन तपासणी व दंडात्मक कारवाई पूर्णपणे कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने केली जात असल्याचे कार्यालयाने म्हटले आहे.

परिवहन आयुक्तालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सध्या विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. रस्ते सुरक्षा बळकट करणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि अवैध वाहतुकीवर नियंत्रण मिळविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले.

वृत्तात उल्लेख केलेल्या दंडात्मक कारवाईच्या प्रकरणात संबंधित वाहनाने मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने नियमानुसार दंड आकारण्यात आला होता. या कारवाईचा अन्य कोणत्याही बाबींशी संबंध नसल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये शासनाने दिलेले महसूल संकलनाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याचा दावा केला आहे. संकलित झालेला संपूर्ण महसूल शासकीय तिजोरीत जमा करण्यात आला असून सर्व दंडाची रक्कम ई-चलन प्रणालीद्वारे थेट शासकीय खात्यात जमा होत असल्याने रोख व्यवहार किंवा मध्यस्थीला कोणतीही संधी नसल्याचे सांगण्यात आले.

सध्या ओव्हरलोड वाहतूक, विनापरवाना वाहतूक तसेच कर न भरलेल्या वाहनांवर विशेष कारवाई सुरू असून भविष्यातही नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे कार्यालयाने नमूद केले आहे. दरम्यान, वाहनधारकांना त्रास देणे हा विभागाचा उद्देश नसून रस्त्यावरील शिस्त राखणे आणि नागरिकांचे प्राण वाचविणे हेच प्रमुख ध्येय असल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले. सततच्या तपासणी मोहिमा आणि रस्ता सुरक्षा जनजागृतीमुळे जानेवारी ते मे 2025 च्या तुलनेत जानेवारी ते मे 2026 या कालावधीत जिल्ह्यातील अपघातांच्या संख्येत 15.99 टक्के घट झाल्याचा दावा विभागाने केला आहे.

 ‘कार्ड पद्धत’ किंवा ‘टोकन सिस्टीम’ यासारखी कोणतीही व्यवस्था अस्तित्वात नसून असे दावे पूर्णपणे काल्पनिक असल्याचे सांगत कार्यालयाने त्यांचे स्पष्ट खंडन केले आहे. वाहन तपासणी अथवा दंडात्मक कारवाईबाबत कोणतीही शंका, तक्रार किंवा आक्षेप असल्यास नागरिकांनी थेट उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलढाणा यांच्याशी संपर्क साधावा किंवा कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी हा खुलासा प्रसिद्ध करण्यात आल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात 11 डॉग शेल्टरसाठी पावणेपाच कोटींची भरीव तरतूद,- महापालिकेसह जिल्ह्यातील 10 नगरपरिषद, नगरपंचायतींचा समावेश- भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाययोजना

नालसा, मालसा योजना, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये विषयांवर जनजागृती कार्यक्रम*

राज्य व जिल्हा यंत्रणांनी संपर्कात राहून समन्वयानं नागरिकांच्या बचाव व मदतकार्याला प्राधान्य द्यावं -मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची प्रशासनाला सूचना शेती, पिके, पशुधन, घरांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश

उमेद’ विभागीय, जिल्हा मिनी सरस महोत्सवाची सांगता;सांस्कृतिक कार्यक्रम, विक्री व प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद