vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल; सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’चे बोधचिन्ह आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल; सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’चे बोधचिन्ह आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

पुणे, प्रतिनिधी: ‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’ या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनस्थळांचे महत्व अधोरेखित होईल आणि पर्यटकांची संख्या वाढेल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच प्रदूषणावर मात करत पुण्याची “सायकलचे शहर” ही ओळख पुन्हा प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्य शासन, पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’ चे बोधचिन्ह व जर्सी अनावरण समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, आशियाई सायकलिंग महासंघाचे माजी महासचिव ओंकारसिंग, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सायकलचे माहेरघर असलेल्या पुण्यात खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. प्रदूषण आणि जीवनशैलीतील बदलांमुळे उद्भवणाऱ्या आजारांचा विचार करता सायकल चालविण्याला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. जगभरात सायकलस्वारांचा आदराने गौरव केला जातो. या पार्श्वभूमीवर ‘पुणे ग्रॅण्ड टूर’ सायकलिंग संस्कृतीला नवा आयाम देईल.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही स्पर्धा पुण्याला जगाच्या नकाशावर घेऊन जाणारी ठरेल. देशात सायकल श्रीमंताचे वाहन म्हणून दीडशे वर्षांपूर्वी आली होती. त्यावेळी सायकल वापरण्यासाठी परवाना लागायचा. पुण्यात १९४७ साली पहिली सायकल स्पर्धा झाली होती. त्यामुळे पुण्याची ओळख ‘सायकलचे शहर’ म्हणून होती, आणि ही सायकल संस्कृती आजही शहराच्या अभिमानाचा भाग आहे. जागतिक वेळापत्रकात या स्पर्धेचा समावेश झाल्याने तिचे आयोजन अत्यंत यशस्वी ठरेल आणि ही स्पर्धा देशासाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्पर्धेसाठी भिमाशंकर, महाबळेश्वर आणि भंडारदरा परिसरातील ‘भारतीय शेकरू’ या दुर्मिळ प्रजातीवर आधारित बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. याद्वारे ग्रामीण पर्यटनाला चालना मिळून रोजगारनिर्मिती होईल व राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. ही स्पर्धा म्हणजे आरोग्य, रोजगार, पर्यटन आणि विकासाचा एकत्रित महोत्सव ठरेल, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन होत असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्र्यांनी अल्पावधीत केलेल्या तयारीबद्दल जिल्हा प्रशासन व सर्व शासकीय यंत्रणांचे अभिनंदन केले. तसेच स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री खडसे म्हणाल्या, देशात २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आहे. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताकडे वाटचाल करताना क्रीडा क्षेत्राचा वाटा मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. रविवारी ५ ते ६ हजार ठिकाणी ‘सायकल ऑन संडे’ उपक्रम संपूर्ण देशभर राबविला जात आहे, ज्यामध्ये सुमारे ५ लाख सायकलपटू सहभागी होतात. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘फिट इंडिया’हे स्वप्न पूर्ण होणार आहे.

केंद्र सरकारचे क्रीडा धोरण हे क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून देशभर पुढे नेण्यावर केंद्रित आहे. महाराष्ट्रात विविध पर्यटनस्थळे असल्याने ‘पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूर’च्या माध्यमातून क्रीडा पर्यटनाचे उत्तम उदाहरण देशभर दिले जाईल. क्रीडा विज्ञान हे एक नवे क्षेत्र असून, त्याद्वारे राज्यातील खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणता येईल, असेही रक्षा खडसे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ‘पुणे ग्रॅण्ड टूर –२०२६’ची संकल्पना आणि तयारी विषयी माहिती दिली.बोधचिन्ह, जर्सीचे अनावरण आणि शुभंकर प्रदर्शित

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व अन्य मान्यवरांच्या हस्ते ‘पुणे ग्रँड टूर -२०२६’ च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर जंगलात आढळणाऱ्या शेकरूवर ( उडती खार ) आधारित स्पर्धेचे ‘ इंदू ‘ हे शुभंकर जारी करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, राहूल कुल, सिद्धार्थ शिरोळे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.‘पुणे ग्रँड टूर -२०२६ चे मुख्य प्रायोजक बजाज, प्रायोजक सिरम इन्स्टिटयूट, चितळे बंधु आणि पंचशील ग्रुप असून यावेळी त्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

००००

संबंधित पोस्ट

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पदभरती

जाफराबाद आगारातून १३ नव्या एस.टी. बस सेवा सुरु- आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावतीत 24 मार्चला भव्य रोजगार मेळावा; टीसीएस मध्ये नोकरीची संधी

राष्ट्रीय मतदार दिन शनिवारी(दि.२५);विविध कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

आईसाठी एक जिवंत आदरांजली: ठाण्यात मातृदिनानिमित्त अभिनव उपक्रमांची प्रेरणादायी सुरुवात*

महाराष्ट्र शासनाचे ४, ८, ९ व १० वर्षे मुदतीचे प्रत्येकी १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..