vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी नारळ व सुपारी उत्पादक शेतकऱ्यांकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत

हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी नारळ व सुपारी उत्पादक शेतकऱ्यांकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत

 

रायगड-अलिबाग, द प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील नारळ व सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळावे, यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अंतिम मुदत असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.

जिल्ह्यात यंदा आंबा व काजू या फळपिकांसोबतच नारळ व सुपारी या फळपिकांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे. हवामान धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादनात घट झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण व नुकसानभरपाई मिळण्यास या योजनेची मदत होणार आहे. सन २०२६-२७ मधील आंबिया बहारासाठी विमा पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

रायगड जिल्ह्यात नारळ पिकासाठी ११ महसूल मंडळे, तर सुपारी पिकासाठी ११ महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत. अलिबाग तालुक्यात अलिबाग, किहीम, सारळ, चौल व नागाव; मुरुड तालुक्यातील मुरुड, नांदगाव व बोर्ली; तर श्रीवर्धन तालुक्यात बोर्ली पंचतन व वाळवटी या महसूल मंडळांचा समावेश आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) असणे आवश्यक आहे. तसेच ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपमध्ये फळपिकाची नोंद असणे बंधनकारक आहे. विमा अर्ज आपले सरकार सेवा केंद्र (CSC), बँक किंवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन भरता येईल. विमा अर्जासोबत फळबागेचे जिओ टॅगिंग केलेले छायाचित्र विमा पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.

खातेदार शेतकऱ्यांसह कुळ व भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरीही या योजनेत सहभागी होऊ शकतात. मात्र, भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नोंदणीकृत भाडेकराराची माहिती विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास, अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी संबंधित बँकेत घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला अधिसूचित फळपिकासाठी किमान ०.१० हेक्टर ते कमाल ४ हेक्टर क्षेत्रासाठी विमा नोंदणी करता येईल.

नारळ पिकासाठी प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम १ लाख ७० हजार रुपये असून, शेतकऱ्यांचा विमा हप्ता प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपये आहे. सुपारी पिकासाठी प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम १ लाख रुपये असून, शेतकऱ्यांचा विमा हप्ता प्रति हेक्टर ४ हजार रुपये आहे.या योजनेत वेगाचा वारा, जास्त तापमान, जास्त पाऊस व जास्त आर्द्रता तसेच कमी पाऊस या हवामान धोक्यांचा समावेश आहे. निर्धारित कालावधीत संबंधित हवामान निकष पूर्ण झाल्यास नियमानुसार विमा संरक्षणाचा लाभ मिळू शकतो. वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाल्यास संबंधित विमा कंपनी अथवा कृषी विभागाकडे ७२ तासांच्या आत तक्रार करणे आवश्यक आहे.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा. रायगड जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी राहुल लाडगें यांच्याशी ८३०८००६६०० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.नारळ व सुपारी उत्पादक शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर विमा नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.

000

 

संबंधित पोस्ट

जनगणना 2027 मधील हाऊस लिस्टिंग विषयक तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरास उत्साहात प्रारंभ*

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

मेळघाटात 10 मोबाईल टॉवरला मंजुरी*जिल्हा सनियंत्रण समितीची मान्यता

चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

कुकडी व घोड प्रकल्पातील प्रलंबित कामांचा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आढावा,कालवा दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही

केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख ९ हजार कोटींचे कर वितरण; महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी