vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूरमध्ये दिवाळीच्या पूर्वसंध्येला शेतकरी कुटुंबांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश; सावकाराने बळकावलेल्या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना परत▪️ अवैध सावकारीविरोधात लातूर जिल्हा प्रशासनाकडून मोहिम; वैध सावकारांच्या व्यवहारांचीही होणार तपासणी

लातूरमध्ये दिवाळीच्या पूर्वसंध्येला शेतकरी कुटुंबांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश; सावकाराने बळकावलेल्या जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना परत▪️ अवैध सावकारीविरोधात लातूर जिल्हा प्रशासनाकडून मोहिम; वैध सावकारांच्या व्यवहारांचीही होणार तपासणी

राज्य प्रतिनिधी-शेतकऱ्यांची अर्थिक विवंचना आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अवैध सावकारांनी बळकावलेल्या जमिनी मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना परत मिळाल्या आहेत. राज्य शासनाच्या सहकार विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे दोन शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या हक्काची जमीन मिळाली असून, यामुळे या कुटुंबांची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदमय झाली आहे.

लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विभागाकडून बेकायदेशीर खासगी सावकारीविरुद्ध धडक मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १८ (२) मधील कायदेशीर तरतुदींचा प्रभावी वापर करत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विष्णू पोतंगले यांनी दोन महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये सावकारीसाठी करण्यात आलेली बेकायदेशीर खरेदीखते रद्द ठरवली होती.

चाकूर तालुक्यातील कलकोटी येथील मंडुबाई इराप्पा डावरे यांनी मुलीच्या लग्नासाठी स्थानिक सावकार किसन गोविंद अलमले यांच्याकडून व्याजाने कर्ज घेतले होते. या कर्जाच्या सुरक्षेची हमी म्हणून सावकाराने त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत शेतजमिनीचे खरेदीखत करून घेतले होते. सहकार विभागाच्या चौकशीत हा व्यवहार खरेदी-विक्रीचा नसून सावकारी कर्जासाठी घेतलेली हमी असल्याचे सिद्ध झाले. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून, या निर्णयामुळे श्रीमती मंडुबाई यांना त्यांची १ हेक्टर ८० आर जमीन परत देण्यात आली आहे.

आर्थिक अडचणींमुळे निलंगा तालुक्यातील थोर माकणी येथील वामन श्रीपती सूर्यवंशी यांनी सावकार शरद दिगंबर पाटील यांच्याकडून कर्ज घेतले होते. सावकाराने त्यांच्या ४० आर जमिनीची हमी लिहून घेत ती स्वतःच्या व नंतर इतर व्यक्तीच्या नावावर करून घेतली होती. जिल्हा उपनिबंधकांच्या चौकशीत हा व्यवहारही बेकायदेशीर सावकारीसाठी झाल्याचे पुराव्यांवरून सिद्ध झाले असून त्यांनाही त्यांची जमीन कायदेशीररीत्या परत मिळाली आहे.

लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते गुरुवारी संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा हस्तांतरित करत सातबारा सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विष्णू पोतंगले उपस्थित होते.*अवैध सावकारी विरोधात कठोर बडगा; ८ अवैध सावकारांवर गुन्हे दाखलमहाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम १८ नुसार, सहकार निबंधकांना सावकारी व्यवहारातून बळकावलेली मालमत्ता शोधून ती मूळ मालकाला परत मिळवून देण्याचे विशेष अधिकार आहेत. या अधिकाराचा वापर करून जिल्हा उपनिबंधकांनी अशी खरेदीखते रद्द केली आहेत. तसेच, अवैध सावकारी करणाऱ्या आठ व्यक्तींविरुद्ध सहकार विभागामार्फत कलम ३९ अन्वये विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात बालुरे पिराजी बाबुराव (रा. संतोषी माता नगर, उदगीर), औसा पोलीस स्टेशन येथे आदिल मदारसाब शेख (रा. खोरे गल्ली) आणि फारुक उस्मानसाब सय्यद (रा. आलमपूरा) यांच्याविरुद्ध, तर मुरुड पोलीस स्टेशन अंतर्गत सौरभ अशोककुमार गर्ग (रा. हत्ते नगर, लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच निलंगा पोलीस स्टेशन येथे तुकाराम इस्माईल वजनम (रा. निलंगा) यांच्याविरुद्ध आणि लातूर येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे बिबीता ऊर्फ कविता बालाजी शिंदे (रा. खाडगाव रोड, लातूर) यांच्याविरुद्ध, तसेच काशिनाथ हणमंतराव म्हेत्रे (रा. नाईक चौक, लातूर), संतोष रावसाहेब उपाडे (बार्शी रोड, लातूर), तर विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात पांडुरंग सिद्राम सूर्यवंशी (जुना बाभळगाव रोड, लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अवैध सावकारीबाबत प्राप्त तक्रारीनंतर टाकलेल्या धाडीत मिळालेल्या प्रथमदर्शी पुराव्यांमुळे ही कार्यवाही करण्यात आली आहे.

अवैध सावकारी विरोधात जिल्ह्यात १४५ तक्रारी प्राप्त झाल्या असून आजपर्यंत ६६ प्रकरणांत चौकशी पूर्ण झाली आहे. त्यापैकी १४ प्रकरणात तथ्य आढळून आले असून ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरीत तक्रारींविषयी पुढील कार्यवाही गतीने सुरू आहे.

*अवैध सावकारीविरोधात तक्रार नोंदवा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन,शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा किंवा आर्थिक विवंचनेचा गैरफायदा घेऊन जमीन खरेदीखताद्वारे लिहून घेणे हा कायद्याने गुन्हेगारी स्वरूपाचा बेकायदेशीर सावकारी व्यवहार आहे. कोणत्याही शेतकऱ्याची अशी फसवणूक झाली असल्यास, त्यांनी न घाबरता थेट सहकार विभागाकडे तक्रार दाखल करावी. पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन आणि प्रशासन कटिबद्ध आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सांगितले. यापुढेही अवैध सावकारी विरोधात प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून दोषींवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.*परवानाधारक सावकारांच्या व्यवहारांचीही होणार तपासणी,अवैध सावकारी विरोधात जिल्हा प्रशासनाने मोहीम तीव्र केली आहे. यासोबतच परवानाधारक सावकारांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व ३७३ परवानाधारक सावकारांच्या व्यवहारांची तपासणी करण्यात येणार आहे. या सावकारांनी ३५३४ जणांना १९ कोटी ७१ लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. नियमबाह्य पद्धतीने होणाऱ्या सावकारीला पायबंद घालण्यासाठीतातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या आहेत. तसेच सर्व परवानाधारक सावकारांकडून करण्यात आलेल्या कर्ज वितरणाची पडताळणी करून याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

 

*****

Collector Latur

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश ससून डॉक बाबत घेतली आढावा बैठक

अल् निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९२ टक्के असेल, ईशान्य भारत वगळता देशभरात पावसाचं प्रमाण कमी– हवामान विभागाची माहिती.

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात 117 उपाययोजनांचा समावेश

vishwatmaklokswamivarta

हक्काच्या अधिकृत घरांच्या चाव्या मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – हणमंत जगदाळे,क्लस्टर, डीपी रोड आणि रिंग मेट्रो प्रकल्पाला गती देण्याचा ठामपा सभागृह नेते हणमंत जगदाळे यांचा निर्धार,लोकमान्यनगर-शास्त्रीनगरवासियांचा निर्धार मेळावा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास कामांबाबत सर्व विभागांनीउपाययोजना संयुक्तपणे राबवाव्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी