vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

ठाणे जिल्ह्यात ‘राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताह २०२६’ अंतर्गत विविध उपक्रम‘लहान बाळे, मोठी क्षमता : त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पाठपुरावा सेवेत गुंतवणूक करा’ या संकल्पनेवर भर

ठाणे जिल्ह्यात ‘राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताह २०२६’ अंतर्गत विविध उपक्रम‘लहान बाळे, मोठी क्षमता : त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पाठपुरावा सेवेत गुंतवणूक करा’ या संकल्पनेवर भर

 

ठाणे, प्रतिनिधी: नवजात बालकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात १५ ते २१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताह २०२६’ विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येत आहे. “लहान बाळे, मोठी क्षमता : त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पाठपुरावा सेवेत गुंतवणूक करा” ही यावर्षीची थीम असून, नवजात बालकांना आरोग्य संस्थेतून घरी सोडल्यानंतर त्यांच्या आरोग्याचा नियमित व जोखीम-आधारित पाठपुरावा करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

नवजात बालकांच्या आरोग्य सेवांमध्ये सातत्याने सुधारणा होत असून, विविध स्तरांवर राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे भारताचा नवजात मृत्यू दर (NMR) सन २००० मधील प्रति १,००० जिवंत जन्मांमागे ४४ वरून सन २०२४ मध्ये १८ पर्यंत कमी झाला आहे. महाराष्ट्राचा नवजात मृत्यू दर प्रति १,००० जिवंत जन्मांमागे १० इतका आहे. नवजात मृत्यू दर आणखी कमी करून एक अंकी पातळीवर आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.

या सप्ताहांतर्गत विशेषतः अकाली जन्मलेली, कमी वजनाची, आजारी तसेच SNCU, NICU, MNCU आणि NBSU मधून उपचार घेऊन घरी परतलेल्या नवजात बालकांची अद्ययावत यादी तयार करून त्यांचा नियोजित पाठपुरावा करण्यात येणार आहे. आरोग्य संस्था, आशा, एएनएम, समुदाय आरोग्य अधिकारी तसेच संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधून बालकांच्या काळजीचे सातत्य सुनिश्चित केले जाणार आहे.

नवजात बालकांच्या पाठपुराव्यामध्ये स्तनपान, कांगारू मदर केअर (KMC), पोषण, लसीकरण, वजनवाढ, विकासाचे टप्पे आणि धोक्याची लक्षणे याबाबत पालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार ROP तपासणी, श्रवण तपासणी, विकासात्मक मूल्यांकन आणि तज्ज्ञांकडे संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे.

समुदाय स्तरावर आशा, एएनएम व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त गृहभेटींच्या माध्यमातून जोखमीखालील नवजात बालकांची तपासणी करण्यात येणार आहे. या भेटींमध्ये स्तनपान, KMC, वजनवाढ, लसीकरण, विकासाचे टप्पे आणि पाठपुरावा भेटींची पूर्तता यांचा आढावा घेतला जाणार आहे. गरज भासल्यास बालकांना योग्य आरोग्य संस्थेत वेळेत संदर्भित करण्यात येणार आहेआरोग्य संस्थास्तरावर पात्र नवजात बालकांना डिस्चार्ज देताना वैद्यकीय स्थिती, आहार व KMC सल्ला, वाढ निरीक्षण, पाठपुरावा वेळापत्रक, आवश्यक तपासण्या आणि संदर्भ सूचना याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेताना आरोग्य संस्था, कुटुंब आणि समुदाय यांच्यातील समन्वय अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे.

नवजात बालकांचे आरोग्य जपण्यासाठी पालकांनी स्तनपान, योग्य पोषण, ऊब, स्वच्छता, लसीकरण आणि नियोजित पाठपुरावा याबाबत आवश्यक काळजी घ्यावी. बालकांमध्ये धोक्याची लक्षणे आढळल्यास विलंब न करता शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

०००

ठाणे जिल्ह्यात २२ नोव्हेंबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

२ लाख १ हजार ९५६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट; १ हजार ८७९ लसीकरण बूथ व १ हजार ३८६ घरभेट पथक.

ठाणे, -: देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला बळकटी देण्यासाठी ठाणे जिल्ह्यात दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ५ तालुके, २ नगरपरिषदा तसेच ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात या मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक पात्र बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे.

मोहिमेसाठी जिल्ह्यात व्यापक सूक्ष्म नियोजन (Micro Plan) पूर्ण करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत सुमारे २ लाख १ हजार ९५६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी ग्रामीण व शहरी भागात मिळून १ हजार ८७९ लसीकरण बूथ उभारण्यात येणार असून, ४ हजार ३२६ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. बूथच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी ३७६ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी विशेष घरभेट मोहिमेचेही नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अंदाजे ६ लाख ७२ हजार ३६६ घरांना भेटी देण्यासाठी १ हजार ३८६ पथके कार्यरत राहणार आहेत. यासाठी एकूण ५ हजार ४१९ पथक-दिवसांचे नियोजन करण्यात आले असून, ४२३ पर्यवेक्षक या कामावर देखरेख ठेवणार आहेत.

बसस्थानके, रेल्वे स्थानके, तपासणी नाके तसेच स्थलांतरित नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात आले आहे. याठिकाणी ७७ ट्रान्झिट पथके कार्यरत राहणार असून, त्यांच्यासाठी २५३ पथक-दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच दुर्गम व विशेष परिस्थितीतील भागांमध्ये लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी १३१ मोबाईल पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व इतर आरोग्य संस्था सहभागी होणार आहेत. मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी ७६ वैद्यकीय अधिकारी तसेच ३४ जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक कार्यरत राहणार आहेत. लसींची गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी ४ हजार ३९५ कोल्ड चेन उपकरणे व १ हजार २९२ लस वाहक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पालकांना आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ लसीचा डोस देण्यासाठी जवळच्या लसीकरण केंद्रावर किंवा बूथवर घेऊन जाण्याचे आवाहन केले. तसेच घरभेटीदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.

पोलिओमुक्त भारताचे यश कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. या मोहिमेला पालक, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासनाने सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

३ ते १५ ऑगस्टदरम्यान जनजागृतीचे विविध उपक्रम; “अवयवदान-जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प” अभियानाला सुरुवात

🏥📊 आरोग्य कार्यक्रम अंमलबजवनी निर्देशकामध्ये गडचिरोली जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानी

मानसिक आरोग्य आढावा मंडळावरअशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहनअर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत मंडळात लातूर, नांदेड, बीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश..

जिल्हा रुग्णालयाकडून ५५ मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

आज नांदुरा तालुक्यात महाराजस्व अभियान अंतर्गत सर्व ६ महसुली मंडळांमध्ये प्रत्येक मंडळाच्या एका महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

vishwatmaklokswamivarta

श्री गणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत श्रीवर्धन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

vishwatmaklokswamivarta