
जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सुविधेचा लाभ घ्यावा
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी आता बँक किंवा कोषागार कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. अँड्रॉइड मोबाईलवर ‘Jeevan Pramaan’ ॲप डाऊनलोड करून ओटीपी आणि फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून घरबसल्या डिजिटल हयातीचा दाखला अर्थात जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. रायगड जिल्ह्यात 18 हजार 600 कोषागार निवृत्तीवेतनधारक असून डिजिटल जीवन प्रमाणपत्राचे काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी दि.14 ते दि.30 नोव्हेंबर 2026 दरम्यान बँक, महा ई सेवा केंद्र, जिल्हा कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालयात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सुविधेचा सर्व निवृत्तीवेतनधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
केंद्र सरकारने निवृत्तीवेतनधारकांची ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियानांतर्गत ॲपद्वारे प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अभियान 5 मध्ये सर्व निवृत्तीवेतनधारकांनी सक्रिय सहभाग घ्यावा.
कार्मिक, लोकशिकायत व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात निवृत्तीवेतन नियमित सुरू ठेवण्यासाठी हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक असते. मात्र, डिजिटल सुविधांमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. अँड्रॉइड मोबाईलमध्ये ‘Jeevan Pramaan’ ॲप डाऊनलोड करून आवश्यक नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ओटीपी व चेहरा प्रमाणीकरण (Face Authentication) तंत्रज्ञानाद्वारे स्वतःचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करता येते. त्यामुळे ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ज्या निवृत्तीवेतनधारकांना मोबाईलद्वारे स्वतः ही प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नाही, त्यांना संबंधित बँक शाखा, जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांच्या मदतीने डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.
DLC साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया निवृत्तीवेतनधारकांकडे पीपीओ क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि EMAIL ID आवश्यक आहे. डिजिटल प्रमाणपत्र सादर करताना नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि पीपीओ क्रमांक अचूक नोंदविणे आवश्यक आहे. संस्थेचा प्रकार ( organization) म्हणून state government /UT निवडावे , मंजुरी देणारे प्राधिकरण म्हणून State government Maharashtra निवडावे , वितरण संस्था म्हणून ‘Maharashtra State Treasury’ आणि संबंधित कोषागार म्हणून ‘RAIGAD / RAIGARH DTO यांची योग्य निवड करावी.
अधिक माहिती व सहाय्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, संबंधित उपकोषागार कार्यालय किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधावा. डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या माध्यमातून चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आणि निवृत्तीवेतनधारकांची प्रक्रिया सुलभ करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घेऊन ‘देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान 5’ यशस्वी करावे.
0000000



