
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका देशात सर्वप्रथम…
नवी मुंबई प्रतिनिधी- स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 मध्ये नवी मुंबई देशातील सर्वप्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराची मानकरी ठरली असून यानिमित्त महापौर श्रीम.सुजाता पाटील, उपमहापौर श्री.दशरथ भगत व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी विविध वृत्तपत्र, वृत्तचित्रवाहिनी प्रतिनिधींशी वार्तालाप करीत या बहुमानात पत्रकारांचाही महत्वाचा वाटा असल्याचे सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. अजय गडदे उपस्थित होते.
‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025-26’ मध्ये नवी मुंबईने देशातील सर्वप्रथम क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा बहुमान पटकाविला आहे. नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात देशाच्या महामहीम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते, नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी, उपमहापौर श्री.दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड यांच्या उपस्थितीत हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार स्विकारला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री ना.श्री.मनोहरलाल खट्टर, राज्यमंत्री ना.श्री.तोखन साहू व सचिव श्री. सत्येंद्र सिंग आणि इतर मान्यवर अतिथी उपस्थित होते. या पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे उपस्थित होते.
हा सन्मान ‘स्वच्छ भारत मिशन – शहरी’ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचे प्रतीक आहे. मागील वर्षी नवी मुंबईने देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या सुपर स्वच्छ लीग या विशेष कॅटेगरीत मानांकन प्राप्त केले होते. यावर्षी अधिक उंच झेप घेत देशातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकाविला आहे. यासोबतच कचरामुक्त शहराचे सर्वोच्च सेव्हन स्टार मानांकन तसेच ओडीएफ कॅटेगरीत सर्वोच्च वॉटर प्लस मानांकन नवी मुंबईने कायम राखले आहे.
देशातील प्रथम क्रमांकाच्या यशामागील वेशिष्ट्ये :घनकचरा व्यवस्थापन व चक्रीय अर्थव्यवस्था – संसाधनांच्या चक्राचे पूर्णत्व• नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील दैनंदिन जमा होणा-या १००% कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाते.• ओल्या कचऱ्यासाठी ३५० टन प्रतिदिन आणि सुक्या कचऱ्यासाठी ४०० टन प्रतिदिन क्षमतेच्या सुविधा आहेत.• यामधून ओल्या कच-यातून ‘हरित ब्रँड’ कंपोस्ट आणि सिमेंट कारखान्यांसाठी उच्च दर्जाचे आरडीएफ तयार होते
प्रमुख उपक्रम:• टेक्स्टाइल रिकव्हरी फॅसिलिटी (टीआरएफ पुनर्सूत्र): वापरानंतरच्या कपड्यांच्या कचऱ्याचे संकलन व मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये रूपांतर; स्वयंसहाय्यता गटांना रोजगार; वस्त्रोद्योग मंत्रालय, एसबीआय फाउंडेशन इत्यादींच्या सहकार्याने चक्रीय मूल्यसाखळी.• झिरो वेस्ट स्लम मॉडेल: झोपडपट्टीच्या वस्त्यांमध्ये (इंदिरा नगर, अडवली गाव, हनुमान नगर इ.) वर्गीकृत कचरा गोळा करून त्यावर तिथेच प्रक्रिया करणारी यंत्रणा ; स्त्री मुक्ती संघटना यांच्या सहकार्याने कचरावेचक महिला कामगारांना रोजगार.• निसर्ग उद्यान: कोपरखैरणे येथील जुन्या क्षेपणभूमीवर (११.४ एकर) शास्त्रोक्त प्रक्रिया करून १.३ लाखांहून अधिक वृक्षांचे शहरी वन निर्मिती, जैवविविधता पुनर्स्थापना आणि सार्वजनिक मनोरंजनाचे ठिकाण उभारणी– या मॉडेलची अनेक ठिकाणी पुनरावृत्ती.• बांधकाम व पाडकाम कचरा (सी अँड डी वेस्ट) पुनर्वापर : बांधकाम कचऱ्याचे पेव्हर ब्लॉक्स व अॅग्रीगेट्समध्ये रूपांतर;• प्लास्टिकपासून सुविधा साहित्य निर्मिती : प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या सहयोगाने प्लास्टिक कचऱ्याचे बाके, डस्टबिन इ. सार्वजनिक सुविधा साहित्य निर्मितीत रूपांतर.• स्वच्छता पार्क १.० व २.०: स्रोत वर्गीकरण, कंपोस्टिंग आणि चक्रीय अर्थव्यवस्था याबाबत एक लाखांहून अधिक नागरिकांना व विशेषत्वाने विद्यार्थ्यांना शिक्षित करणारे संवादात्मक पर्यावरण शिक्षण केंद्र.कार्यक्षम जल व्यवस्थापन – चक्रीय जल, शाश्वत विकास
नवी मुंबईची जलसंपन्नता ही मोरबे धरणामुळे (साठवण क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर, दैनंदिन उचल क्षमता ४५० दशलक्ष लीटर) आहे. शहरात १,३९८ किमी लांबीचे जलवितरण जाळे एससीएडीए प्रणालीद्वारे नियंत्रित केले जाते. एनआरडब्ल्यू २०% पेक्षा कमी राखून १५० एलपीसीडी मानके साध्य केली आहेत. एएमआरयूटी २.० अंतर्गत 24 x 7 पाणीपुरवठा प्रणाली बेलापूर प्रभागात ४० डीएमएद्वारे १५,००० पेक्षा अधिक ग्राहकांपर्यंत यशस्वीपणे राबविण्यात आली.
स्वच्छता क्षेत्रात, दैनंदिन निर्माण होणाऱ्या २६० दशलक्ष लीटर सांडपाण्यावर 7 आधुनिक एसबीआर आधारित मलप्रक्रिया केंद्रे आणि 4 टर्शरी ट्रीटमेंट प्लांट (एकूण क्षमता ५२.५ दशलक्ष लीटर) द्वारे १००% प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यापैकी ३०% पेक्षा अधिक पाणी औद्योगिक, उद्यान, बांधकाम आणि इतर गैर-पिण्याच्या वापरासाठी १७७ किमी लांबीच्या विशेष पाइपलाइन नेटवर्कद्वारे पुन्हा वापरले जाते. या चक्रीय मॉडेलमुळे नवी मुंबई महानगरपालिकाला सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारात सर्वोत्तम स्थानिक स्वराज्य संस्था (प्रथम क्रमांक) तसेच महाराष्ट्रातील पहिले वॉटर प्लस शहर होण्याचा बहुमान मिळाला आहे.
एकात्मिक तंत्रज्ञान व सुलभ नागरिक सेवा
नवी मुंबई महानगरपालिकाने 1) युनिफाइड सिटीझन सर्विस पोर्टल, 2) ‘माय एनएमएमसी’ मोबाइल अॅप, 3) व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि 4) एआय-सक्षम आभासी सहाय्यक यांचा समावेश असलेली बहुआयामी व्यापक डिजिटल व्यवस्था उभारली आहे. या प्रणालीव्दारे एक खिडकी सेवा, कार्यालयातील प्रत्यक्ष भेटीची गरज संपुष्टात आली आहे आणि कामकाजातील पारदर्शकता वाढली आहे.
एआय-आधारित तक्रार बुद्धिमत्ता प्रणाली ही नागरिकांकडून प्राप्त तक्रारींची प्रमाणित वर्गवारी, त्याचे स्तर आणि कृतिशील रूपांतर करते.
एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) हे शहरी स्वच्छतेचे डिजिटल केंद्र असून, २९१ मार्गांवर २४६ वाहनांचे रिअल-टाइम जीपीएस ट्रॅकिंग, वर्गीकरण अनुपालन निरीक्षण, सीसीटीव्ही व्दारे देखरेख आणि सेवेतील कमतरता याबाबत त्वरित संदेश देते.
वर्षभरात राबविलेले स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम, उपक्रम व महत्त्वाच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी
नवी मुंबई महानगरपालिकाने वर्षभरात स्वच्छता, चक्रीय अर्थव्यवस्था आणि नागरिक सहभाग याबाबत अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत.• एनएसएस विद्यार्थी व स्वयंसेवकांसोबत मेगा खाडी किनारा व खारफुटी स्वच्छता मोहीम : सेवा संकल्प अभियान – स्वच्छता ही सेवा अंतर्गत (सप्टेंबर २०२६) किनारी ठिकाणांवर (दिवाळेजेट्टी, सारसोळे जेट्टी, वाशी जेट्टी, तुर्भे तलाव, धारण तलाव, घणसोली जेट्टी, ऐरोली जेट्टी, दिघा तलाव आणि डोलाया बीच, करावे इ.) मोठ्या प्रमाणात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्या. २,००० हून अधिक एनएसएस विद्यार्थी, नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी व स्वयंसेवकांनी प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, पादत्राणे व इतर नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा काढला. सामूहिक स्वच्छता शपथ घेण्यात आली. या मोहीमा थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने प्रभावीपणे राबविण्यात आल्या.• बाजारपेठांमध्ये एकल वापर प्लास्टिक (SUP) बंदी मोहीम : कोपरखैरणे, घणसोली, सानपाडा व इतर बाजारपेठांमध्ये जनजागृती व अंमलबजावणी मोहिमा राबविण्यात आल्या. प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांकडून दंड आकारण्यात आला. एनएसएस विद्यार्थी यांचेमार्फत वर्तमानपत्राच्या पेपर बॅगचे तसेच कापडी पिशव्यांचे वितरण करून प्लास्टिकमुक्त पर्यायांना प्रोत्साहन दिले.• इको-फ्रेंडली गणपती उत्सव: शाडू मातीच्या गणेशमूर्तींना सक्रिय प्रोत्साहन. पर्यावरणपूरक मूर्ती निवडणाऱ्या नागरिकांना विसर्जनस्थळी प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
गणेशोत्सवादरम्यान विसर्जनस्थळांवरून ५,२०४ किलो निर्माल्य संकलित करून कंपोस्टमध्ये रूपांतरित करण्यात आले. यामध्ये नानासाहेब धर्माधिकारी संस्थेचा सहयोग घेण्यात आला. 260 कृत्रिम विसर्जन तलाव निर्मिती, सजावटीत प्लास्टिक/ थर्माकोलचा वापर नियंत्रण आणि विसर्जनानंतरची त्वरित स्वच्छता यावर भर देण्यात आला.



