
माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान प्रभावीपणे राबवा : मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण यांचे आवाहनजिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींचा सहभाग; उत्कृष्ट ग्रामपंचायतींना कोट्यवधींची पुरस्कार रक्कम
बुलढाणा, प्रतिनिधी: गावागावांत आरोग्य, स्वच्छता, पोषण, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या आरोग्यविषयक सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत ‘माझे गाव – आरोग्यसंपन्न गाव’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे अंमलबजावणी करून गावांना आरोग्यदृष्ट्या सक्षम बनवावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण यांनी केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ८७० ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग नोंदविला आहे. अभियानांतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध आरोग्यविषयक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच त्यांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.
स्वच्छता, पाणी संवर्धन आणि पर्यावरण संवर्धनावर भर : अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावात सुरक्षित व शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, पाणी गुणवत्ता तपासणी, पाण्याचे शुद्धीकरण, वृक्षारोपण, धूरमुक्त गाव, कचरा संकलन व वर्गीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, गावाची स्वच्छता आणि जलसंवर्धन यांसारख्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात येणार आहे. लोकसहभागातून गावाचे पर्यावरण स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यावर विशेष भर राहणार आहे.
माता-बाल आरोग्य आणि कुपोषण निर्मूलनाला प्राधान्य : माता व बालमृत्यू रोखणे, बालकांचे संपूर्ण लसीकरण, तीव्र व मध्यम तीव्र कुपोषित बालकांचे योग्य व्यवस्थापन, गर्भवती महिलांची नियमित आरोग्य तपासणी आणि संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. माता व बाल आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
असंसर्गजन्य आजारांच्या तपासणीवर विशेष लक्ष : गावातील नागरिकांची उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांसाठी तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच क्षयरोग व कुष्ठरोग नियंत्रण, मानसिक आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्यसेवा, दिव्यांगांसाठी आरोग्य सुविधा, किशोरवयीन आरोग्य आणि आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आरोग्यविषयक जनजागृती, नियमित आरोग्य शिबिरे, लोकसहभागातून स्वच्छता उपक्रम आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करून नागरिकांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक जाणीव निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
उत्कृष्ट ग्रामपंचायतींना कोट्यवधींची पुरस्कार रक्कम : अभियानांतर्गत विविध आरोग्य व विकास निर्देशांकांच्या आधारे ग्रामपंचायतींचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी ५ कोटी रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ कोटी रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २ कोटी रुपये पुरस्कार देण्यात येणार आहेत. तर जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे २५ लाख, २० लाख आणि १५ लाख रुपयांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
सामूहिक सहभागातून गावांचे आरोग्य उंचावणार : या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य यंत्रणा, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक गावाने आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आपले गाव स्वच्छ, निरोगी व आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण यांनी केले आहे.
00000



