
LED मासेमारीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई।काशिद समोरील जलधिक्षेत्रात LED दिवे व जनरेटरसह नौका जप्त
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी रायगड जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात अनधिकृत व अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने (दि.09 नोव्हेंबर व दि.12 नोव्हेंबर 2026) रोजी काशिद समोरील जलधिक्षेत्रात गस्तीदरम्यान LED दिवे व जनरेटरच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या नौकेवर धडक कारवाई करून नौकेसह LED साहित्य व जनरेटर जप्त करण्यात आले.
रायगड जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे समुद्रात गस्त सुरू असताना, विभागाच्या मा.आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा.अतिरिक्त आयुक्त मत्स्यव्यवसाय (योजना), मा. सहआयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, (परवाना अधिकारी) मुरुड-जंजिरा स्वप्निल अ. दाभणे यांनी ही कारवाई केली.
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन LED दिवे व जनरेटरच्या साहाय्याने अनधिकृत मासेमारी करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या नामदेव महादेव कावळे, रा. दिघी, रायगड यांच्या मालकीच्या “साईरत्न” (नौका नोंदणी क्रमांक IND-MH-३-MM-4457) व हितेंद्र नरेश डबरी, रा.अलिबाग कोळीवाडा यांच्या मालकीची विना नोंदणीकृत नौका या नौकेवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 व सुधारित अधिनियम, 2021 अन्वये कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान “साईरत्न” या नौकेवर एकूण 8 LED फोकस, ३ पाण्याखालील दिवे व 01 जनरेटर तसेच “विना नोंदणीकृत नौकेवरती” एकूण 17 LED फोकस, 2 पाण्याखालील दिवे, ३ Cyan Light व 01 जनरेटर जप्त करण्यात आले असून जप्त साहित्य सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रायगड-अलिबाग यांच्या कार्यालयात जमा करण्यात आले असून या नौका ताब्यात घेऊन रेवदंडा येथील जेट्टीवर आणून जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 व सुधारित अधिनियम, 2021 अन्वये पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अवैध मासेमारी, LED दिव्यांचा वापर तसेच मत्स्यसंपत्तीचे नुकसान करणाऱ्या प्रकारांवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून नियमित गस्त व कठोर कारवाई सुरू राहणार असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या नौकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागामार्फत देण्यात येत आहे.
0000000



