vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र वेतन नियम, २०२६ लागू; कामगारांच्या वेतन संरक्षणाला बळ-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर· आठ तासांचा शिफ्ट, साप्ताहिक विश्रांती आणि अतिकालिक वेतनाची तरतूद

महाराष्ट्र वेतन नियम, २०२६ लागू; कामगारांच्या वेतन संरक्षणाला बळ-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर· आठ तासांचा शिफ्ट, साप्ताहिक विश्रांती आणि अतिकालिक वेतनाची तरतूद

मुंबई, प्रतिनिधी: राज्य शासनाने ‘महाराष्ट्र वेतन नियम, २०२६’ अधिसूचित केले असून ते ५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून संपूर्ण राज्यात लागू झाले आहेत. या नियमांमुळे वेतन संहिता लागू असलेल्या आस्थापनांतील कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतनाची गणना, कामाचे तास, साप्ताहिक विश्रांती, अतिकालिक वेतन, वेतन कपात आणि वेतन नोंदी याबाबत एकसमान कार्यपद्धती लागू झाली आहे. या वेतन नियमामुळे कामगारांच्या वेतन संरक्षणाला बळ मिळाले आहे, अशी माहिती कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिली आहे.

राज्य शासनाने या नियमांद्वारे महाराष्ट्र किमान वेतन नियम, १९६३ आणि महाराष्ट्र वेतन प्रदान नियम, १९६३ अधिक्रमित केले आहेत. वेतन संहिता, २०१९ अंतर्गत तयार केलेले हे नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन निश्चित करण्यासाठी लागू होणार नाहीत.

वेतनाच्या प्रमाणित व्याख्येमध्ये मूळ वेतन, महागाई भत्ता आणि रिटेनिंग भत्त्याचा समावेश आहे. वेतनातून वगळलेल्या भत्त्यांचे किंवा अन्य घटकांचे प्रमाण एकूण मोबदल्याच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास त्यापेक्षा जास्त रक्कम वेतनात समाविष्ट केली जाईल. त्यामुळे ‘ ग्रॅच्युइटी’सह अन्य वैधानिक लाभांच्या गणनेसाठी वेतनाचा आधार अधिक स्पष्ट होईल.

राज्य शासन किमान वेतनाचा दर दैनंदिन आधारावर निश्चित करेल. दैनंदिन वेतनास आठने भागून तासाचा दर, तर २६ ने गुणून मासिक दर निश्चित केला जाईल. कामाच्या स्वरूपानुसार अतिकुशल, कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा व्यवसायांच्या श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत.

कामगारांच्या परिवर्तनीय महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा केली जाईल. भारत सरकारच्या श्रम ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या औद्योगिक कामगारांच्या सरासरी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे दरवर्षी १ एप्रिलपूर्वी आणि १ ऑक्टोबरपूर्वी त्याची गणना होईल. दैनंदिन वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सामान्य कामकाजाचा दिवस आठ तासांचा असेल. अन्य वेतन कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांचे काम आठवड्याला ४८ तासांपेक्षा अधिक असणार नाही. प्रत्येक कर्मचाऱ्यास साप्ताहिक विश्रांती देणे आवश्यक असून विश्रांतीच्या दिवशी काम घेतल्यास बदली विश्रांती द्यावी लागेल.

अतिकालिक कामासाठी कर्मचाऱ्याला लागू असलेल्या तरतुदींनुसार वेतन द्यावे लागेल. विश्रांतीच्या दिवशी काम केल्यास अतिकालिक वेतनाचा दर सामान्य वेतनाच्या दुपटीपेक्षा कमी असणार नाही. पीस रेट दर पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही विश्रांतीच्या दिवशी केलेल्या कामासाठी अतिकालिक दराने वेतन आणि बदली विश्रांतीच्या दिवसासाठी लागू दराने वेतन मिळेल.

एका वेतन कालावधीत कर्मचाऱ्याच्या वेतनातून होणारी एकूण कपात ५० टक्क्यांपेक्षा अधिक करता येणार नाही. त्यापेक्षा अधिक रक्कम पुढील वेतन कालावधीत टप्प्याटप्प्याने वसूल करावी लागेल. दंड किंवा नुकसानभरपाईपोटी कपात करण्यापूर्वी नियोक्त्याने कर्मचाऱ्याला लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कारणे दाखवा सूचना देऊन स्पष्टीकरणाची संधी देणे बंधनकारक आहे.

0000

संबंधित पोस्ट

वाराणसी येथे ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’च्या ९४ व्या उपक्रमाचं आयोजन

vishwatmaklokswamivarta

हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

जिजाऊ च्या समाजाभिमुख उपक्रमांमुळे प्रेरित हजारो विद्यार्थी व नागरिकांकडून मा. श्री. निलेश भगवान सांबरे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा!

राज्यांतर्गत पीकस्पर्धेसाठी अर्ज सुरू; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*खरीप हंगाम २०२६ मध्ये ११ पिकांसाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर स्पर्धा; राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास ५० हजारांचे बक्षीस

महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी संजय मिसाळ 

कोकणा सह  मध्य महाराष्ट्रात मुंबई उपनगरात आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज..

vishwatmaklokswamivarta