vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एकल पाल्यांच्या शिक्षणाला मिळणार समुपदेशनाचा आधार; राज्यातील १,२३८ महाविद्यालयांत समुपदेशक नियुक्त – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

एकल पाल्यांच्या शिक्षणाला मिळणार समुपदेशनाचा आधार; राज्यातील १,२३८ महाविद्यालयांत समुपदेशक नियुक्त –  मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

मुंबई, प्रतिनिधी एकल मातांच्या पाल्यांचे उच्च शिक्षण कोणत्याही परिस्थितीत अडथळ्याविना सुरू राहावे, तसेच त्यांना येणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि भावनिक अडचणींवर मात करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व आधार मिळावा, या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत ‘एकल पाल्य समुपदेशन’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले, या उपक्रमांतर्गत राज्यातील १,२३८ अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी एका समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे. एकल पाल्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना येणाऱ्या विविध अडचणी समजून घेणे, त्यांना उपलब्ध शासकीय सुविधा व योजनांची माहिती देणे आणि आवश्यकतेनुसार योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, ही या समुपदेशकांची प्रमुख जबाबदारी असणार आहे.

एकल पाल्यांच्या शैक्षणिक व सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून त्यांच्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचविण्याच्या दृष्टीने डॉ. हेमलता बागला यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शासनाला आपल्या शिफारशी सादर केल्या आहेत. तसेच राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या एकल पाल्यांची नेमकी संख्या आणि त्यांच्या गरजा जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. समितीच्या शिफारशी आणि सर्वेक्षणातून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी ठोस योजना आखण्यात येणार आहेत. विद्यापीठ स्तरावर मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण या उपक्रमाच्या अंमलबजावणीचा पुढील टप्पा सुरू होत आहे.

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे येथे ‘एकल पाल्य समुपदेशन’ या विषयावर एकदिवसीय मास्टर ट्रेनर्स कार्यशाळेचे शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक सार्वजनिक विद्यापीठातून तीन मुख्य प्रशिक्षकांची निवड करण्यात आली असून, यामध्ये सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि विद्यार्थी कल्याण संचालकांचा समावेश आहे.

या कार्यशाळेत एकल पाल्य विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे आकलन, बागला समितीच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी, संवेदनशील समुपदेशनाची कौशल्ये तसेच आवश्यकतेनुसार संबंधित सेवा व संस्थांकडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी पाठविण्याची प्रणाली या विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रशिक्षणानंतर संबंधित मास्टर ट्रेनर्स विद्यापीठ स्तरावर राज्यातील सर्व १,२३८ महाविद्यालयांमध्ये नियुक्त समुपदेशकांना प्रशिक्षण देतील. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयात एकल पाल्य विद्यार्थ्यांना प्रशिक्षित समुपदेशकांच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि भावनिक आधार उपलब्ध होणार आहे. समावेशक आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरणाच्या दिशेने पाऊल महाविद्यालयातील समुपदेशक हे एकल पाल्य विद्यार्थ्यांसाठी विश्वासाचे आणि आधाराचे केंद्र ठरणार आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना उपलब्ध शैक्षणिक सुविधा व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासात येणाऱ्या अडचणींचा वेळोवेळी आढावा घेणे, यावर विशेष भर दिला जाणार आहे, असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

एकल पाल्य विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे, तर सामाजिक आणि भावनिक स्तरावरही सक्षम बनविणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि उच्च शिक्षणाच्या प्रवाहात त्यांचा सहभाग टिकवून ठेवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्था अधिक समावेशक, संवेदनशील आणि विद्यार्थिकेंद्रित करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, सहसचिव प्रताप लुबाळ, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव अमोल मुत्याल, सहासंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे उपस्थित होते.

 

००००

संबंधित पोस्ट

राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘विशेष बाल पोलीस पथक’ अनिवार्य,बालहक्क संरक्षण आयोगाच्या वैधानिक सूचना; वाढत्या गुन्ह्यांवर कठोर पाऊलराज्यात अल्पवयीन मुला-मुलींसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ : आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांची माहिती 

शिर्डी येथे होळीनिमित्त श्री साईबाबा संस्थान तर्फे समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट..

विधानपरिषदकामकाज….

विधानपरिषद प्रश्नोत्तरे शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर;अहवालांतील विलंबही कमी होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४८ हजार २९६ नागरिकांची आरोग्य तपासणी**६५० आरोग्य शिबिरांचे आयोजन; ५०६ रुग्ण पुढील उपचारासाठी संदर्भित**१० हजार ८९४ रक्ततपासण्या; ६९० जणांचे रक्तदान, २ हजार ३२ नागरिकांची आभा कार्डसाठी नोंदणी*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन आज होणार साजरा, मुंबईत शिवाजी पार्क इथं राज्यपालांच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता होणार ध्वजवंदन

vishwatmaklokswamivarta