केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2027-28 साठीच्या व्यापक पूर्व-अर्थसंकल्पीय सल्लामसलती केल्या पूर्ण 13 क्षेत्रे आणि हितधारक गटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 200 हून अधिक हितधारकांचा पूर्व-अर्थसंकल्पीय सल्लामसलतींमध्ये सहभाग
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2027-28 साठीच्या व्यापक पूर्व-अर्थसंकल्पीय सल्लामसलती केल्या पूर्ण-13 क्षेत्रे आणि हितधारक गटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 200 हून अधिक हितधारकांचा पूर्व-अर्थसंकल्पीय सल्लामसलतींमध्ये सहभाग…
नवी दिल्ली, प्रतिनिधी-केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2027-28 तयार करण्यासाठी 16 ते 26 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पूर्व-अर्थसंकल्पीय सल्लामसलतींच्या मालिकेचे अध्यक्षस्थान भूषवले. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2027-28 साठी आज नवी दिल्ली येथे युवा प्रतिनिधींसोबत झालेल्या 13 व्या आणि अंतिम पूर्व-अर्थसंकल्पीय सल्लामसलतीचे अध्यक्षस्थान भूषवले.
3 क्षेत्रे आणि हितधारक गटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 200 हून अधिक हितधारकांनी या सल्लामसलतींमध्ये सहभाग घेतला. यामध्ये उद्योग संघटना, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातले मान्यवर , शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, युवा प्रतिनिधी तसेच कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रातले व्यावसायिक , उत्पादन क्षेत्र, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) व स्टार्टअप्स, भांडवली बाजार आणि बँकिंग, वित्तीय सेवा व विमा (बीएफएसआय), माहिती तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि शाश्वतता, रोजगार आणि कामगार, गृहनिर्माण, नागरीकरण आणि संस्कृती, आरोग्य आणि सामाजिक विषय, संशोधन आणि विकास व उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकास आणि क्रीडा, युवा व्यवहार आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील व्यावसायिकांचा समावेश होता. यावर्षी युवा प्रतिनिधींसोबत सल्लामसलत आयोजित करणे हा एक अभिनव उपक्रम होता.
या सल्लामसलतींमधून भारताची मानवी संसाधन क्षमता, नवोन्मेष परिसंस्था, उत्पादन क्षेत्राची स्पर्धात्मकता, कृषी उत्पादकता, गृह सुरक्षितता आणि शैक्षणिक परिणाम अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने भविष्याभिमुख शिफारशींची विस्तृत श्रेणी समोर आली. आर्थिक विकासाला अधिक गती देतानाच व्यापक आणि सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करणाऱ्या सुधारणांची गरज हितधारकांनी अधोरेखित केली.प्राप्त झालेल्या प्रमुख सूचनांमध्ये जैवखते आणि प्रगत जैवतंत्रज्ञानावर आधारित कृषी निविष्ठांच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना; स्थानिक पातळीवर उपलब्ध हार्डवेअरच्या क्षमतेनुसार अनुकूलित क्षेत्रविशिष्ट कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल विकसित करून या क्षेत्रातील भारताची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी उपक्रम; तसेच ग्रामीण युवक आणि कामगारांना उत्पादक बिगर-कृषी रोजगार आणि शाश्वत उद्योगांकडे वळण्यासाठी मदत करणाऱ्या लक्ष्यीत उपाययोजनांचा समावेश होता.
इयत्ता 5 वी पूर्ण होईपर्यंत प्रत्येक मुलाला वृत्तपत्र वाचता आणि त्यातील मजकूर समजून घेता यावा, यासाठी देशव्यापी वाचन चळवळ सुरू करण्याची शिफारसही सहभागीनी केली. गृहनिर्माण क्षेत्रात शहरी भागांमध्ये परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढवण्यासाठी भाडेतत्त्वावरील घरांना महत्त्वपूर्ण पर्याय म्हणून प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर हितधारकांनी भर दिला. शिक्षणातून रोजगार आणि उद्योजकतेकडे संक्रमण करणाऱ्या तरुण भारतीयांना पाठबळ देण्यासाठी द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांच्या विकासाला गती देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.
एकत्रितपणे या शिफारशींमध्ये नवोन्मेषावर आधारित विकासाला प्रोत्साहन देणे, रोजगाराच्या संधींचा विस्तार करणे, सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधा बळकट करणे तसेच अधिक सक्षम आणि भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज अर्थव्यवस्था उभारणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
पूर्व-अर्थसंकल्पीय सल्लामसलत हा अर्थसंकल्प तयार करण्याच्या सरकारच्या सहभागात्मक आणि सल्लामसलत आधारित दृष्टिकोनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या माध्यमातून विविध हितधारकांना भारताच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांना आणि आर्थिक विकासाच्या धोरणाला आकार देण्यासाठी योगदान देण्याची संधी मिळते.