vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या 23व्या दीक्षांत समारंभाला केले संबोधित

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या 23व्या  दीक्षांत समारंभाला  केले संबोधित..

पुणे प्रतिनिधी-उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या 23व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी बोलताना उपराष्ट्रपतींनी सिम्बायोसिस संस्था, आंतरराष्ट्रीय सामंजस्य, शैक्षणिक उत्कृष्टता आणि सर्वसमावेशक शिक्षणाचे प्रतीक असल्याचं नमूद केले. ते म्हणाले, “सिम्बायोसिस या नावतूनच सहअस्तित्व, परस्पराप्रती असलेला आदरभाव आणि विविध संस्कृति आणि विचारांच्या एकत्रित येण्यातून आलेली समृद्धी यांचे दर्शन घडते.” भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संस्कृतिविषयक तत्वज्ञानाचा संदर्भ देत ते म्हणाले, “जगासमोर आज गुंतगुंतीची आव्हाने उभी ठाकली असताना, शिक्षण हेच राष्ट्रे, संस्कृति आणि समुदायाचा सेतु बनले पाहिजे. “

सिम्बायोसिस संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या विस्ताराची उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली. संस्थेने 2024 साली दुबई मध्ये आपली पहिली आंतरराष्ट्रीय शाखा (कॅम्पस) स्थापन केल्याचे त्यांनी नमूद केले. अशा उपक्रमांमुळे भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील शैक्षणिक संबंध अधिक दृढ होऊन, जागतिक उच्च शिक्षण क्षेत्रात भारताचे स्थान अधिक बळकट झाल्याचे ते म्हणाले.

2025-26 या शैक्षणिक वर्षात सिम्बायोसिस संस्थेत सुमारे 62,000 विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यात देशभरातील 29,000 मुली असल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. 85 देशांतील 3,000 हून अधिक विद्यार्थी इथे शिकत असल्याचे सांगत, यातून या विद्यापीठाची सर्वसमावेशक आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणाप्रती असलेली आपली बांधीलकी दिसून येते असे त्यांनी अधोरेखित केले.

उच्च शिक्षणामधे महिलांच्या वाढत्या यशावर प्रकाश टाकताना उपराष्ट्रपती म्हणाले की, देशभरातील दीक्षांत समारंभांना उपस्थित राहताना, पदवी आणि पदकं मिळवण्यात सातत्याने महिला पुरुषांपेक्षा वरचढ असल्याचे दिसून आले आहे. ते म्हणाले, “माझ्यासाठी हे नारी शक्तीच्या वाढत्या सामर्थ्याचे द्योतक आहे. हेच खरे महिला सक्षमीकरण आहे.” महिलांसाठी उघडण्यात आलेल्या सिम्बायोसिस वैद्यकीय महाविद्यालयची प्रशंसा करत, वैद्यकीय शिक्षणात महिलांना अधिक संधी मिळवून देण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले महत्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

उपराष्ट्रपती म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत ‘विकसित भारताच्या’ ध्येयाकडे वाटचाल करत आहे. गेल्या बारा वर्षात उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय विस्तार झाल्याचे सांगत, 2014-15 या वर्षात असलेली 760 विद्यापीठांची संख्या वाढून आजमितीला ती 1400 झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी नमूद केले की IIT ची संख्या 16 वरून 23, IIM ची संख्या 13 वरून 22 आणि AIIMS संस्थांची संख्या 8 वरून 23 पर्यंत वाढली आहे. उच्च शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या विद्यार्थी प्रवेशांची संख्या, जी, 2014-15 मध्ये 3.4 कोटीं होती, ती वाढून आज 4.5 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

एक जबाबदार जागतिक भागीदार म्हणून भारताच्या भूमिकेचा उल्लेखही उपराष्ट्रपतींनी आपल्या संबोधनात केला. भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (ITEC – Indian Technical and Economic Cooperation) कार्यक्रमाचे महत्वही त्यांनी अधोरेखित केले. 160 पेक्षा जास्त भागीदार देशांतील व्यावसायिक तज्ञ आणि अधिकारी या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत. 2014 पासून ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांमधील 30,000 महिलांसह 80,000 पेक्षा जास्त व्यावसायिक तज्ञांनी या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे अशी माहिती त्यांनी दिली. परस्पर आदर आणि समानतेच्या आधारावर भागीदार देशांसोबत आपल्याकडील ज्ञान, कौशल्ये आणि तांत्रिक नैपुण्याची देवाणघेवाण करण्यावर भारताचा ठाम विश्वास असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.युपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) आणि इंडिया स्टॅक यांसारख्या उपक्रमांमधून जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, आर्थिक समावेशन आणि सुशासनातील भारताचे वाढते योगदान अधोरेखित झाल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. टांझानियातील झांझिबार इथे भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रासचे आंतरराष्ट्रीय संकुल सुरु झाले आहे. ही घडामोड म्हणजे आफ्रिकेसोबतच्या भारताची शैक्षणिक आणि तांत्रिक भागीदारी विस्तारत असल्याचेच आणखी एक उदाहरण आहे, असे त्यांनी नमूद केले.2023 मधील भारताच्या जी 20 च्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचे स्मरणही उपराष्ट्रपतींनी यावेळी केले. भारताच्या प्रयत्नामुळे आफ्रिकन महासंघाला जी 20 चे स्थायी सदस्यत्व मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. जागतिक निर्णयप्रक्रियेत आफ्रिकेचे प्रतिनिधित्व भक्कम करण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्वाचे पाऊल ठरले असल्याचे ते म्हणाले.

कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा आणि वैज्ञाननिष्ठ नवोन्मेष यांमुळे वेगवान होत असलेल्या तांत्रिक बदलांचा संदर्भही त्यांनी मांडला. याच संदर्भाने पदवीधरांनी आयुष्यभर शिकत राहावे असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या पदव्या हा त्यांच्या आयुष्यातला एक मौल्यवान पाया आहे, मात्र आयुष्यभर शिकत राहण्याची वृत्ती हीच त्यांची सर्वात मोठी संपत्ती ठरणार आहे, असे ते म्हणाले.विद्यार्थ्यांनी सचोटीने उत्कृष्टतेचा ध्यास घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. व्यावसायिक पातळीवरचे यश महत्वाचे असतेच, मात्र त्याचवेळी चारित्र्य आणि नैतिक आचरण यांमुळेच कायम टिकणारा आदर मिळतो असे ते म्हणाले. उद्योजकता, संशोधन, लोकसेवा, उद्योग आणि सामाजिक नवोन्मेषाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीत योगदान द्यायला हवे असे आवाहन त्यांनी पदवीधरांना केले.

 

संबंधित पोस्ट

जलपुनर्भरणासंदर्भात व्यापक जनजागृती करावी – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्‌घाटन

पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बुलढाण्यात विशेष लोककल्याण मेळावा

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  बालभवनच्या नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी केली.

विधान परिषद निवडणूक, पदवीधर मतदार संघ २०२६                                                                                    मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवाचा वारसा आता जागतिक डिजिटल संग्रहात; ‘bappa.org’ वर अनुभव, परंपरा आणि आरतीचा ठेवा डिजिटल स्वरुपात जतन करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घडवले लोकधारेचे दर्शन !शिर्डीत जलसंपदा विभागाचा सांस्कृतिक सोहळा उत्साहात 

vishwatmaklokswamivarta