vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जनगणना २०२७ च्या कामास जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे- मुख्य सचिव राजेश अग्रवाल १० ते २४ जानेवारीदरम्यान स्वयं-गणना; २५ जानेवारीपासून घरोघरी लोकसंख्या गणना

जनगणना २०२७ च्या कामास जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे- मुख्य सचिव राजेश अग्रवाल,१० ते २४ जानेवारीदरम्यान स्वयं-गणना; २५ जानेवारीपासून घरोघरी लोकसंख्या गणना

मुंबई, प्रतिनिधी: जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. जनगणनेच्या माध्यमातून संकलित होणारी माहिती पुढील नियोजन आणि विविध विकासकामांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले

जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रधान जनगणना अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय परिषद आज सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या आभासी उपस्थितीत झाले.

जनगणनेतील माहिती अचूक असणे महत्त्वाचे – डॉ. निरुपमा डांगेसंयुक्त सचिव (भारत सरकार) व मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, महाराष्ट्र डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी जनगणनेतील माहिती अचूकपणे संकलित करण्याचे महत्त्व विशद केले. जनगणनेतील त्रुटींचा परिणाम मतदारसंघ पुनर्रचना, वैधानिक आरक्षण तसेच आगामी दशकातील लोकसंख्याविषयक मूलभूत आकडेवारीवर होऊ शकतो. त्यामुळे राज्यभरात तैनात करण्यात येणाऱ्या सुमारे २.८४ लाख प्रगणक व पर्यवेक्षकांनी प्रत्येक व्यक्तीची नोंद होईल, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

बेघर व्यक्ती, वसतिगृहे, कारागृहे, हॉटेल्स, पेइंग गेस्ट निवासस्थाने तसेच दुर्गम आणि वंचित भागांतील लोकसंख्येची नोंद घेण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासाठी ४० प्रश्नांची डिजिटल प्रश्नावली, प्रगणकांसाठी पीई मोबाइल ॲप, ऑनलाइन स्वयं-गणना आणि रिअल-टाइम देखरेख प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे

शहरी भागातील आव्हानांचा विचार करून नियोजन करा – डॉ. के. एच. गोविंदराज,अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी शहरी भागातील जनगणनेदरम्यान येणाऱ्या आव्हानांकडे लक्ष वेधले. महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील सुमारे ५० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत असल्याने स्थलांतर, नागरिकांची सततची ये-जा, दाट वस्ती आणि शहरांचा विस्तार यांचा विचार करून नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बंद किंवा रिकाम्या घरांसाठी आवश्यकतेनुसार पुन्हा भेटी देणे, प्रगणकांची नियुक्ती व प्रशिक्षण वेळेत पूर्ण करणे, तसेच त्यांना आवश्यक सुविधा आणि मानधन उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.

प्रशिक्षण आणि पूर्वतयारी वेळेत पूर्ण करा – रणजित सिंग देओल,प्रधान सचिव व राज्य नोडल अधिकारी रणजित सिंग देओल यांनी जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याच्या वेळापत्रकाची आणि राज्यातील तयारीची माहिती दिली. प्रगणक व पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या, प्रशिक्षण आणि संबंधित प्रशासकीय प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी जिल्हास्तरीय प्रशिक्षणात सहभागी होऊन कामकाजाचा नियमित आढावा घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

जनगणना २०२७ चे राज्यातील वेळापत्रक,महाराष्ट्रात १० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन स्वयं-गणना पोर्टलद्वारे स्वतःची माहिती नोंदवता येणार आहे. त्यानंतर २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन लोकसंख्या गणना करतील. २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री बेघर लोकसंख्येची गणना करण्यात येईल, तर १ ते ५ मार्च २०२७ या कालावधीत पुनरावलोकन फेरी होणार आहे.

या टप्प्यात नागरिकांची लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक आणि आर्थिक माहिती संकलित करण्यासाठी ४० प्रश्नांची डिजिटल प्रश्नावली वापरण्यात येणार आहे. यामध्ये नाव, कुटुंबप्रमुखाशी असलेले नाते, लिंग, वय, वैवाहिक स्थिती, धर्म, जात, दिव्यांगत्व, मातृभाषा, शिक्षण, व्यवसाय, रोजगार आणि स्थलांतर यासंबंधी माहितीचा समावेश आहे.

परिषदेत जनगणना अधिनियम व नियम, पीई मोबाइल ॲप, एचएलबीसी आणि सीएमएमएस पोर्टल, गणना क्षेत्रांची निश्चिती, जनजागृती आणि देखरेख यासंबंधी तांत्रिक सत्रे घेण्यात आली. मास्टर ट्रेनर्स, जिल्हा व चार्ज अधिकारी आणि तांत्रिक सहाय्यकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. यानंतर प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

परिषदेस नवी दिल्ली येथील भारताचे महानिबंधक कार्यालयाचे उपमहानिबंधक (सी अँड टी) जसपाल सिंग, सर्व विभागीय आयुक्त, राज्यातील प्रधान जनगणना अधिकारी, जनगणना कार्य संचालनालय, मुंबई तसेच महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

००००

संबंधित पोस्ट

नवी मुंबईत ‘हिंद-दी-चादर’श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी**प्रशासन व समाजघटक सज्ज**ऐतिहासिक समागमासाठी प्रशासन, धार्मिक संस्था व सामाजिक संघटनांचा समन्वय; व्यापक नियोजनाची माहिती पत्रकार परिषदेत

vishwatmaklokswamivarta

होय,आपण क्षयरोग संपवू शकतो-पनवेल मनपाचा निर्धार ;टी.बी.मुक्त भारत अभियान अंतर्गत 100 दिवसीय मोहिमेची दमदार सुरुवात

गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

ग्रामपंचायतींच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या भ्रष्ट कारभाराविरोधात उपसरपंच डॉ. अनिल सरकटे आक्रमक; आरोग्य विभागाच्या पत्रात ग्रामपंचायतींच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब!

vishwatmaklokswamivarta

भारत आणि ब्राझील दरम्यान टपाल क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी

जम्मू-काश्मीर पुनर्गठन (दुरुस्ती) विधेयक २०२५ आणि केंद्रशासित प्रदेश शासन (दुरुस्ती) विधेयक २०२५ या महत्त्वपूर्ण विधेयकांवर सखोल चर्चा आणि व्यापक सल्लामसलत सुरू केल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा अपराजिता सारंगी