चाकण येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या २० व्या शाखेचे उद्घाटन, श्री चक्रेश्वर मंदिर परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण-उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते
चाकण येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या २० व्या शाखेचे उद्घाटन, श्री चक्रेश्वर मंदिर परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण-उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते
राज्य प्रतिनिधी-#चाकण येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या २० व्या शाखेचे उद्घाटन, श्री चक्रेश्वर मंदिर परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि कडूस-पानमंदवाडी येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या पाच मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे ऑनलाइन उद्घाटन, पोलीस मदत केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासोबतच शेतीसाठी सिंचनाचे पाणी, दिवसा खात्रीशीर वीजपुरवठा, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि बाजारपेठेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य आहे. शेतकरी टिकला तरच शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था टिकेल, या भूमिकेतून शासन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभ वर्ग करण्यात आले असून, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शेतकरी टिकला तर शेती टिकेल आणि शेती टिकली तर ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच शेतीसाठी पाणी, दिवसा वीज, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेच्या सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती असून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करतानाच पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. चारा उपलब्धतेसाठीही सर्वांनी सहकार्य करावे, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.