
जन गणना 2027 – टप्पा 2 लोकसंख्या गणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठाणे येथेजिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन
ठाणे प्रतिनिधी, : भारताची जनगणना 2027 अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणना (Population Enumeration) प्रक्रियेची प्रभावी, अचूक व कालबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दि.25व 26 नोव्हेंबर 2026 रोजी दोन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथील नियोजन भवन (पहिला मजला) मधील जिल्हा नियोजन समिती सभागृहात हे प्रशिक्षण सुरू असून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने व तहसिलदार श्री. सचिन चौधर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षणाचे कामकाज सुरू आहे.
प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी, ठाणे तसेच ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त यांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या एकूण ३४ चार्ज कार्यालयांतील चार्ज अधिकारी, अतिरिक्त चार्ज अधिकारी, चार्ज लिपिक व तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) यांचा या प्रशिक्षणात सहभाग आहे.
जनगणना संचालनालयाचे उपसंचालक (Deputy Director of Census Operations) श्री. किरण गुरव, श्री. हरीश जाधव, DPA Grade-II तसेच ठाणे जिल्हा जनगणना समन्वयक श्री. चेतन गायधने हे प्रशिक्षक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करीत आहेत.
सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत आयोजित या प्रशिक्षणामध्ये जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेची सविस्तर कार्यपद्धती, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या,जनगणनेशी निगडित विविध संकल्पना व व्याख्या तसेच संकलित माहितीच्या गुणवत्तेचे निकष याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
यासोबतच डिजिटल ॲप व पोर्टलचा वापर, माहितीची अचूक नोंदणी व पडताळणी, छपाई व जनगणना साहित्याचे व्यवस्थापन तसेच जनजागृती व प्रसिद्धी उपक्रम यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रशासकीय व तांत्रिक बाबींचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे.



