vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी डीपीसी, डीएमएफ व अलिमकोच्या समन्वयातून कृती आराखडा राबवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**१६ कल्याणकारी योजनांसाठी तालुकास्तरावरही अर्ज स्वीकारणार*

*दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी डीपीसी, डीएमएफ व अलिमकोच्या समन्वयातून कृती आराखडा राबवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**१६ कल्याणकारी योजनांसाठी तालुकास्तरावरही अर्ज स्वीकारणार*

गडचिरोली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, आरोग्य आणि सुगम्य पायाभूत सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी), जिल्हा खनिज प्रतिष्ठान (डीएमएफ) आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिमको) यांच्या समन्वयातून सर्वंकष कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा निवड, छाननी व पडताळणी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि गावंडे, दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहायक आयुक्त चेतन हिवंज, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक अभिजीत राऊत, अलिमकोचे अधिकारी तसेच विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ आणि राज्य शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत एक टक्का राखीव निधीतून राबवायच्या १६ कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील दिव्यांग व्यक्तींना दर्जेदार सहाय्यक उपकरणे व कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्याबाबत अलिमकोच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या राखीव निधीसोबतच जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि अलिमकोच्या विविध उपक्रमांची सांगड घालून उपलब्ध निधीचा प्रभावी विनियोग करावा. जास्तीत जास्त पात्र दिव्यांग व्यक्तींपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.*तालुकास्तरावर अर्ज स्वीकृतीची सुविधा*

जिल्ह्याचा विस्तीर्ण भौगोलिक विस्तार आणि दिव्यांग व्यक्तींना प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अर्ज स्वीकृतीचे विकेंद्रीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयात, तर नागरी भागातील लाभार्थ्यांना संबंधित नगरपालिका किंवा नगरपंचायत कार्यालयात अर्ज सादर करता येणार आहेत. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, गडचिरोली येथेही अर्ज स्वीकारण्यात येतील.

*रोजगार, शिक्षण आणि गतिशीलतेसाठी अर्थसहाय्य*

राखीव निधीअंतर्गत रोजगार व स्वयंरोजगार करणाऱ्या १८ ते ५० वयोगटातील पात्र दिव्यांग व्यक्तींना ई-व्हेईकलसाठी कमाल तीन लाख रुपये, ई-बाईकसाठी दीड लाख रुपये, तर पात्र अस्थिव्यंग असलेल्या व्यक्तींना इलेक्ट्रिक व्हीलचेअरसाठी एक लाख रुपयांपर्यंत सहाय्याची तरतूद आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना योजनानिहाय पात्रतेनुसार टॅब, टॉकिंग लॅपटॉप, स्क्रीन रीडर, स्मार्ट चष्मे, स्मार्ट केन, ब्रेल किट यांसारखी शैक्षणिक व डिजिटल साधने उपलब्ध करून देण्यासाठी ७५ हजार रुपयांपर्यंत, तर दिव्यांग शाळांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शैक्षणिक साधनांसाठी प्रति संस्था दीड लाख रुपयांपर्यंत सहाय्याची तरतूद आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी २५ हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क सहाय्य देण्याचे नियोजन आहे.

*बालसंगोपन, आरोग्य आणि सुगम्य सुविधांवर भर*वैश्विक दिव्यांग ओळखपत्रासाठी (यूडीआयडी) वैद्यकीय तपासणीस येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना एक हजार रुपये प्रवास भत्ता, पात्र दिव्यांग मातांना वार्षिक २० हजार रुपये बालसंगोपन भत्ता, तर घरकुल लाभार्थी दिव्यांग व्यक्तींना सुगम्य शौचालय बांधकामासाठी २५ हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्याची तरतूद आहे.

याशिवाय सहाय्यक उपकरणांचे प्रदर्शन, आरोग्य तपासणी व यूडीआयडी नोंदणी शिबिरे, रेल्वे व बस प्रवास पास वितरण, शासकीय शाळा व महाविद्यालयांमध्ये रॅम्प आणि सुगम्य शौचालयांची उभारणी, शासकीय कार्यालये, रुग्णालये, बसस्थानके व रस्ते दिव्यांगस्नेही करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

योजनांची प्रचार-प्रसिद्धी, स्थानिक गरजेनुसार सहाय्यक साधनांचे वितरण, नैसर्गिक आपत्तीप्रसंगी पात्र दिव्यांग व्यक्तींना १० हजार रुपयांची मदत तसेच जिल्ह्यातील सर्व २१ दिव्यांगत्व प्रवर्गांतील व्यक्तींचे घरनिहाय अद्ययावत सर्वेक्षण करण्याचाही या योजनांमध्ये समावेश आहे.*पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा*वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी महाराष्ट्राचा अधिवास, किमान ४० टक्के कायमस्वरूपी दिव्यांगत्व, यूडीआयडी कार्ड, तसेच संबंधित योजनेसाठी शासनाने निर्धारित केलेली उत्पन्न मर्यादा, वयोमर्यादा व अन्य पात्रता निकष लागू राहतील.

अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज, यूडीआयडी कार्ड, आधार कार्ड, तहसीलदारांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधारसंलग्न बँक खात्याच्या पासबुकची प्रत तसेच योजनानिहाय आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र दिव्यांग व्यक्तींनी संबंधित पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत किंवा जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहायक आयुक्त चेतन हिवंज यांनी केले आहे.

—

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता आणि कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक देवस्थानांच्या शेकडो एकर जमीनीला धोका पोहोचवणारा- देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात अष्टविनायक मंदिरे एकवटली

अन्न व औषध प्रशासनाकडून मे. डी. ॲण्ड जी फार्मा या औषधी पेढीची तपासणी

२० जूनपर्यंत फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहनपी.एम. किसानसह सर्व शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा*

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही”महिलांविरोधातील गुन्ह्यांसाठी फास्टट्रॅक न्यायालये वाढवण्याची गरज अधोरेखित; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्याकडून विचारपूस