
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘पुस्तकांची दिवाळी’उपक्रमाला वाचनप्रेमी नागरिकांचा उत्साही प्रतिसाद
नवी मुंबई प्रतिनिधी- दिवाळीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासोबतच नागरिकांचे सार्वजनिक उद्यानांशी नाते अधिक दृढ व्हावे आणि त्यांच्या मनात उद्यानांबद्दल आपलेपणाची भावना (Sense of Belonging) निर्माण व्हावी व या माध्यमातून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रविवारी १ नोव्हेंबर २०२६ रोजी वाशी येथील राजीव गांधी उद्यान, सेक्टर 29 येथे ‘पुस्तकांची दिवाळी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात 100 हून अधिक वाचनप्रेमी नागरिक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दिवाळी हा एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा सण आहे. या सणाचे औचित्य साधून पारंपरिक उत्सवाच्या पलिकडे जाऊन माहिती, ज्ञान, वाचन आणि निसर्गाशी नाते जोडण्याचा अभिनव प्रयत्न ‘पुस्तकांची दिवाळी’ या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. नागरिकांनी आपल्या आवडीची पुस्तके सोबत आणून उद्यानातील निसर्गरम्य वातावरणात सामुहिक वाचनाचा आनंद घेतला. पुस्तकांच्या सहवासात दिवाळी साजरी करण्याची संकल्पना उपस्थितांसाठी एक वेगळी आणि आनंददायी अनुभव देणारी ठरली.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ वाचनाची आवड निर्माण करणे हा नसून, नागरिकांनी सार्वजनिक उद्यानांचा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकार करावा हा संदेश देणारा होता. उद्याने ही केवळ फेरफटका मारण्याची किंवा विरंगुळ्याची ठिकाणे नसून, नागरिकांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक सहभागातून विकसित होणारी सामूहिक सार्वजनिक स्थळे आहेत. उद्यानांमध्ये विविध उपक्रम आयोजित केल्यामुळे नागरिकांचा त्या परिसराशी संवाद वाढतो आणि उद्यानाबद्दल आपलेपणा, जिव्हाळा व जबाबदारीची भावना निर्माण होते ही भूमिका या उपक्रमातून जपण्यात आली.
सामूहिक वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी, एकाग्रता, विचारक्षमता आणि ज्ञानवृद्धी यांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच नागरिक आणि विद्यार्थ्यांना एकत्र येऊन सकारात्मक सामाजिक संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली. वाचन उपक्रमानंतर सायं. 5 ते 5.15 या वेळेत उपक्रमाबाबत खुली चर्चा आयोजित करण्यात आली. यामध्ये उपस्थितांनी वाचनाचे महत्त्व, पुस्तकांची भूमिका, सार्वजनिक उद्यानांचा प्रभावी वापर आणि अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये निर्माण होणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी विचारांची देवाणघेवाण केली.
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणे, वाचन संस्कृतीचा प्रसार करणे, सार्वजनिक उद्यानांचा लोकसहभागातून अधिक प्रभावी वापर करणे आणि नागरिकांमध्ये उद्यानांबद्दल ‘हे आपले उद्यान आहे’ ही आपलेपणाची भावना विकसित करणे या व्यापक उद्देश सफल झाल्याचे समाधान उद्यान विभागाच्या उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या या उपक्रमातून सण साजरा करण्याची एक अभिनव, ज्ञानाधिष्ठित आणि पर्यावरणपूरक संकल्पना नागरिकांसमोर आली. 100 हून अधिक नागरिक व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे ‘पुस्तकांची दिवाळी’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वाचन, पर्यावरण आणि सार्वजनिक स्थळांशी नागरिकांचे नाते दृढ करणाऱ्या अशा उपक्रमांमुळे शहरातील सामाजिक व सांस्कृतिक जीवन अधिक समृद्ध होईल असा विश्वास सहभागी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला.



