२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना महापौर श्रीमती रितू तावडे यांचे विनम्र अभिवादन
मुंबई प्रतिनिधी-🔷मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक २६ नोव्हेंबर २०२६) स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी स्वराज्यभूमी येथील हुतात्मा शहीद तुकाराम ओंबळे यांच्या प्रेरणास्थळावर महापौर श्रीमती तावडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
🔷२६/११ च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेले पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा जवान तसेच या हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांनाही महापौर श्रीमती रितू तावडे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
🔷याप्रसंगी ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त श्री. संतोष साळुंखे तसेच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
🔷यावेळी भावना व्यक्त करताना महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, “आजच्याच दिवशी १८ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देऊन दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात मोलाची भूमिका बजावणारे शूरवीर सहायक पोलीस उपनिरीक्षक हुतात्मा तुकारामजी ओंबळे यांना मी समस्त मुंबईकरांच्या वतीने विनम्र अभिवादन करते. तसेच, या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा जवानांना, तसेच आपले प्राण गमावलेल्या निष्पाप मुंबईकरांना मी मुंबईकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. हुतात्म्यांचे अतुलनीय बलिदान आणि मुंबईकरांची जिद्द व एकजूट आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.”