अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे १७९ उत्कृष्ट गणेश व दुर्गा मंडळांचा गौरव; ‘आदर्श गणेशोत्सव व दुर्गोत्सव सन्मान सोहळा’
अमरावती, प्रतिनिधी: जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील ८९ गणेश मंडळे आणि ९० दुर्गा मंडळे अशा एकूण १७९ मंडळांना
उत्कृष्ट मंडळ म्हणून निवडण्यात आले असून, २३ नोव्हेंबर रोजी प्रत्येक पोलीस उपविभाग स्तरावर आयोजित ‘आदर्श गणेशोत्सव व दुर्गोत्सव सन्मान सोहळा २०२६’ मध्ये त्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्कृष्ट गणेश मंडळ’ व ‘उत्कृष्ट दुर्गा मंडळ’ स्पर्धेचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला. सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्था राखली जावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली होती. मंडळांच्या निवडीसाठी १०० गुणांचे सर्वसमावेशक मूल्यांकन पत्रक तयार करण्यात आले होते. यामध्ये परवानगीतील अटींचे पालन, गर्दी व वाहतूक व्यवस्थापन, अग्निसुरक्षा व विद्युत सुरक्षा, डॉल्बीचा वापर टाळून पारंपरिक ढोल-ताशा व वाद्यांचा वापर, उच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन, प्लास्टिकमुक्ती आणि वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करणे अशा निकषांवर मंडळांची निवड करण्यात आली.
रक्तदान, आरोग्य व नेत्रदान शिबिरे, महिला व बालकांची सुरक्षितता आणि दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या किंवा ध्वनीप्रदूषण करणाऱ्या मंडळांसाठी वजा गुणांची व अपात्रतेची तरतूदही करण्यात आली होती. जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या ‘ऑपरेशन कवच’या जनजागृती मोहिमेतही मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या माध्यमातून हेल्मेट वापर, रस्ता सुरक्षा, सायबर सुरक्षितता, आपत्कालीन क्रमांक ११२ चा वापर आणि तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी क्रीडा व विधायक उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आगामी काळातही नागरिकांनी शांतता, शिस्त आणि न्यायालयीन निर्देशांचे पालन करून पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरे करावेत, असे आवाहन अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.