
जिल्हास्तरीय श्रम संवाद कार्यक्रम संपन्न
सांगली, प्रतिनिधी : श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि सहायक कामगार आयुक्त कार्यालय, सांगली यांच्या वतीने आज जिल्हास्तरीय क्षमता बांधणी कार्यक्रम श्रम संवाद संपन्न झाला.
कृष्णा व्हॅली क्लब, एमआयडीसी कुपवाड येथे झालेल्या या कार्यक्रमास भारत सरकारच्या वतीने केंद्रीय कामगार कल्याण आयुक्त ओमप्रकाश सिंग, सहायक संचालक जीवनाथ झा, अपर कामगार आयुक्त भास्कर मोरडे, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या सहायक आयुक्त निधी यादव, कल्याण अधिकारी भीमेश्वर राव, सांगली सहायक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे संचालक रमेश आरवाडे, सतीश हडदरे, सतीश मालू, अर्चना पवार आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय कामगार कल्याण आयुक्त ओमप्रकाश सिंग आणि सहायक संचालक जीवनाथ झा यांनी नव्याने लागू करण्यात आलेल्या वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य संहिता व सामाजिक सुरक्षा संहिता या चारही कामगार संहितांबाबत माहिती दिली. सद्यस्थितीत अस्तित्वात असलेले एकूण चव्वेचाळीस कामगार कायदे निरस्त करून त्यांचे रूपांतर केवळ चार संहिता बनवण्यात आलेल्या आहेत. या संहितांचा उद्देश हा उद्योग आणि कामगार या दोन्ही वर्गाचे हित साधणे हाच आहे. तसेच नव्या प्रकारच्या गिग कामगार, प्लॅटफॉर्म कामगार, वर्क फ्रोम होम करणारे कामगार, इत्यादी सर्व कामगारांना कायद्याचे संरक्षण देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या संहिता लागू करताना उद्योजकांना ज्या विविध कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. त्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थित उद्योजकांनी उपस्थित केलेल्या विविध शंका आणि अडचणींवर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास उपस्थित केंद्र सरकारच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचे स्वागत अर्चना पवार यांनी केले. प्रास्ताविक सहायक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी केले तर आभार सतीश मालू यांनी मानले. सांगली कार्यक्रमास जिल्ह्यातील उद्योजक, मनुष्यबळ विकास अधिकारी, कामगार अधिकारी, वकील इत्यादी उपस्थित होते.
00000



