vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

– क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके जयंतीसशस्त्र क्रांतीचे जनक-क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके

– क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके जयंतीसशस्त्र क्रांतीचे जनक-क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके

विशेष प्रतिनिधी-भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आद्य क्रांतिकारक आणि सशस्त्र क्रांतीचे जनक वंदनीय वासुदेव बळवंत फडके यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन अन् त्रिवार मानाचा मुजरा!

थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८४५ रोजी रायगड जिल्ह्यातील शिरढोणे येथे झाला अन् जणू स्वातंत्र्य लढ्याला प्रकाशमान करणारा क्रांतिसूर्य उदयास आला.तथापि,त्यांचे मुळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातले केळशी होत.वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते.त्यामुळे त्यांच्या रक्ताच्या कणा कणात देशभक्ती भिनली होती.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते.इतकेच नव्हे तर, त्यांनी दत्त महात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला.याशिवाय स्वामी समर्थ महाराज यांचेही ते निस्सिम भक्त होते.वासुदेव बळवंत फडके यांच्या मनावर क्रांतिवीर लहुजी उस्ताद साळवे अन् क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या देशभक्तीपर विचारांचा मोठा पगडा होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत, त्यांच्या गनिमी कावा रणनीती चा प्रभावीपणे अवलंब करत वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांना जेरीस आणले. ब्रिटिश राजवटीविरुद्ध प्रभावी जनमत उभे करण्याच्या उद्देशाने क्रांतिवीर वासुदेव फडके यांनी ऐक्यवर्धिनी सभा आणि पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूट ची स्थापना केली.

सन १८७६-७७ मध्ये भीषण दुष्काळ पडला असता,शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून अन् त्याकडे ब्रिटिश सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने क्रांतिवीर वासुदेव फडके यांच्या मनात फिरंग्यांबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली.पुढे त्यांनी जुलुमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा लढा पुकारला.ब्रिटिश राजवटीला उलथवून टाकण्यासाठी क्रांतिवीर फडके यांनी रामोशी,कोळी,भिल्ल, डांगर यासारख्या मागास व आदिवासी जमातीतील तरुणांना एकसंध करून लष्करी दल उभारले.त्यात दौलतराव नाईक हे त्यांचे प्रमुख विश्वासू सहकारी होते.आपल्या स्वातंत्र्य लढ्याला अधिक बळ मिळावे,यासाठी वासुदेव फडके यांनी हैद्राबाद संस्थानात जाऊन अरब अन् रोहिल्यांची मदत मिळविण्याचा घाट घातला होता.आपल्या लष्करी दलाकरिता पैसा उभारण्यासाठी क्रांतिकारक वासुदेव फडके व त्यांचे लष्करी दल हे ब्रिटिश सरकारी तिजोरीवर व तत्कालिन जुलुमी सावकारांवर गनिमी काव्याने सशस्त्र हल्ले करून त्यांचे खजाने लुटत असत.इतकेच नव्हे तर

 लूटलेला पैसा ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठीदेखील वापरायचे.त्यांचं मुख्य लक्ष्य म्हणजे ब्रिटिश सरकारची दळणवळणाची यंत्रणा अर्थातच रेल्वे,तार यंत्रणा(टेलिग्राफ),

टपाल-कचेऱ्यांना उदध्वस्त करून संपूर्ण नाकेबंदी करण्याचे असायचे.गोली का जवाब गोली से ही त्यांची युद्धनीति होती.पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथे त्यांनी बंडखोरांचे मुख्यालय स्थापन केले होते.भारतभूमीला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपल्या जीवनाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांना आम्ही भारतीय त्रिवार वंदन करतो.मित्रहो,एक काळा दिवस उजाडला अन् त्या दिवशी महान क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची ब्रिटिश अधिकारी मेजर डॅनियल यांनी साफळा रचून घातपात करत फितुरीच्या मदतीने २० जुलै १८७९ रोजी पंढरपूर जवळील कळदगी येथे निद्रावस्थेत असताना धरपकड केली.त्यांना पुढे विविध गुन्ह्यांखाली ब्रिटिश कोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.थोर क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना येमेनमधील ॲडन(अंदमान)तुरुंगात रवाना करण्यात आले.तेथे त्यांचा अतोनात शारीरिक छळ करण्यात आला. इतकेच नव्हे तर,त्यांनी बंदिवासात स्वतःहून अन्नत्यागही केला.या सर्व गोष्टींमुळे अखेर १७ फेब्रुवारी,१८८३ रोजी त्यांची प्राणज्योत मावळली.देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या या महान क्रांतिकारकाला आम्ही सकल भारतीय दंडवत प्रणाम करतो.क्रांतिकारकांच्या रक्ताच्या अभिषेकाने मिळालेले हे बहुमोल स्वातंत्र्य आपण सर्वजण प्राणपणाने जपूया अन् देशाची एकता,अखंडता व सार्वभौमत्व अधिकाधिक मजबूत करण्यास कटिबद्ध होऊया! बोलो,भारत माता की जय!जय हिंद!जय महाराष्ट्र!

लेखक – रणवीर राजपूत,

निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी,मावज,महाराष्ट्र शासन

संबंधित पोस्ट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप- जिल्ह्यात 657 उमेदवारांची नियुक्ती

सागरी मंडळाच्या महसूल वाढीसाठी आराखडा सादर करा- मंत्री नितेश राणे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय!**वारकरी संप्रदायाची बदनामी करणारे ‘ईठ्ठला’ नाटक अखेर स्थगित;*मंत्री उदय सामंत यांची निर्मात्यांना कडक तंबी; नाव, पात्रे आणि संकल्पना बदलण्याचे आदेश..

विशेष लेख :-उन्हाळ्यात जनावरांना होणारी विषबाधा आणि उपाययोजना

लेख : सनातनच्या ग्रंथ-लघुग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !- संस्था-सनातनच्या ग्रंथ-लघुग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !

स्वच्छ सर्वेक्षणामधील सुपर स्वच्छ शहराचे मानांकन टिकविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज !नागरिकांना स्वच्छताविषयक अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन!