vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ‘नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धा’ 

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ‘नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धा’

        नवी मुंबई प्रतिनिधी-   छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ल्यांची परंपरा आणि स्वराज्याची प्रेरणा जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे जतन, दुर्ग संवर्धनाविषयी जनजागृती आणि नागरिकांच्या विशेषत्वाने लहान मुले व युवकांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

  ही स्पर्धा केवळ नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांसाठी खुली आहे. स्पर्धेत शालेय गट आणि खुला गट अशा दोन गटांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सहभागी स्पर्धकांना मातीच्या साहाय्याने ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याची संधी मिळणार आहे. किल्ल्यांची रचना, ऐतिहासिक संदर्भ, कल्पकता आणि सादरीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या गौरवशाली दुर्गपरंपरेचे दर्शन घडविणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.

  स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी रु. ३०,०००, द्वितीय क्रमांकासाठीरु. २०,००० आणि तृतीय क्रमांकासाठी रु. १०,०००अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. शालेय गटात प्रथम क्रमांकासाठी रु. २५,०००, द्वितीय क्रमांकासाठी रु. २०,००० आणि तृतीय क्रमांकासाठी रु. १०,००० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

याशिवाय दोन्ही गटात उत्तेजनार्थ प्रत्येकी रु. ५,००० ची तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

       स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून, नोंदणी संदर्भातील सविस्तर माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लवकरच जाहीर करण्यात येईल. महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये नवी मुंबईतील नागरिकांनी सहभागी होण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

  या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा जागर करण्याची आणि पुढील पिढीपर्यंत ऐतिहासिक वारसा पोहोचविण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ‘गडकिल्ले घडवूया – इतिहास जपूया’ असा गजर करीत स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम व युवक कल्याण समितीचे सभापती श्री. गिरीश कान्हा म्हात्रे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करणार – मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ९ वी व ११ वी प्रवेश परीक्षेसाठी अर्जाची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी अनुसूचित जातींच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी डिजिटल माध्‍यमातून अधिक बळकट करण्यासाठी ‘पीएम-अजय’ पोर्टल आणि ‘अजय’ मोबाईल ॲपचा केला प्रारंभ

देशाच्या विकासासाठी आणि धोरणनिर्मितीसाठी ‘एनएसओ’तर्फे 2026-27 मध्ये विविध सर्वेक्षणांद्वारे महत्वपूर्ण माहितीचे संकलन रोजगार, महागाई, उद्योग आणि कौटुंबिक उत्पन्नाचा घेणार वेध; ‘संख्या मित्रां’ मार्फत होणार माहिती संकलन

महापौर सुजाता पाटील यांनी विशेष बैठकीत घेतला पावसाळी स्थितीचा सविस्तर आढावा 

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी वाहतूक तात्पुरती बंद