नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत शुक्रवार, दि. 27 नोव्हेंबर 2026 रोजी पाणीपुरवठा व्यवस्थेतील बेलापूर ते ऐरोलीपर्यंत मुख्य जलवाहिनीच्या टॅपींगवरील वितरण वाहिनीवर तसेच ईएसआर / जीएसआरमध्ये विविध ठिकाणी नवीन फ्लो मीटर व व्हॉल्व बसविणेचे काम हाती घेण्यात येणार आहे. सदर कामासाठी जलवाहिनीवरील पाणीपुरवठा शुक्रवार दि. 27 नोव्हेंबर 2026 रोजी, सकाळी 10.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत 12 तासांकरीता मुख्य जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
त्यामुळे सदर कालावधीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोडमधील पाणी पुरवठा बंद राहील.
त्या अनुषंगाने शुक्रवार दि. 27 नोव्हेंबर 2026 रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही व शनिवार दि.28 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याची नोंद घेण्यात यावी.
याद्वारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस संपूर्ण सहकार्य करावे.