vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ठाणे एसटी बसस्थानकांतील स्वच्छता आणि प्रवासी सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ठाणे एसटी बसस्थानकांतील स्वच्छता आणि प्रवासी सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करा – परिवहन मंत्री प्रताप सर

मुंबई, प्रतिनिधी : ठाणे शहरातील एसटी बसस्थानकांवरील स्वच्छता आणि प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत प्राप्त तक्रारींची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज ठाणे स्टेशन, वंदना आणि खोपट या तीन बसस्थानकांची अचानक पाहणी केली. या पाहणीदरम्यान बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहतूक नियंत्रण कक्ष तसेच चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची तपासणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छता आणि सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या सभापती तथा नगरसेविका मिनल संके यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मंत्री सरनाईक यांनी ही पाहणी केली. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एसटी बसस्थानकावरील प्रसाधनगृहांची दुरवस्था आणि अस्वच्छता निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बसस्थानकांवरील स्वच्छतेच्या कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करत संबंधित ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. स्वच्छतेच्या कामावर नियमित देखरेख ठेवून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बसस्थानक परिसरात पाडकाम झालेल्या ठिकाणी असलेले बांधकाम साहित्य आणि इतर अनावश्यक वस्तू त्वरित हटवून परिसर स्वच्छ व व्यवस्थित ठेवावा. तसेच नवीन बसस्थानकाचे काम कोणताही विलंब न करता पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

खोपट बसस्थानकातील चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहाची पाहणी करताना मंत्री सरनाईक यांनी तेथे विश्रांती घेत असलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कर्मचाऱ्यांनी बसस्थानकांची प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे सुविधांमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगत अशा प्रकारचे दौरे राज्यभर व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा आणि प्रसन्न वातावरण मिळाल्यास ते अधिक उत्साहाने काम करू शकतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केलर्मचाऱ्यांच्या या प्रतिक्रियेची दखल घेत एसटी महामंडळाचा प्रत्येक कर्मचारी हा महामंडळाचा महत्त्वाचा घटक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांनाही स्वच्छ, सुरक्षित आणि आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त विश्रांतीगृहे उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

खोपट बसस्थानकातील उपलब्ध सोयी-सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. खोपटप्रमाणेच स्वच्छ, नीटनेटकी आणि प्रवाशांसह कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बसस्थानके राज्यातील प्रत्येक विभागात निर्माण झाली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

यावेळी नगरसेविका मिनल संके, नगरसेवक पवन कदम, सुधीर कोकाटे, संजय वाघुले तसेच एसटी महामंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

000

संबंधित पोस्ट

जालना समाचारच्या नावाचा गैरवापर, बनावट जेपीजी तयार करून, सोशल मिडीयावर व्हायरलअज्ञात व्यक्तीचा शोध लावून गुन्हा दाखल करावा- संपादक विकासकुमार बागडी

गरीब आणि मध्यमवर्गीयांना आरामदायी आणि उत्तम प्रवासाचा अनुभव देण्याला रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

१२ गृहनिर्माण संस्थांमध्ये गैरव्यवहार;सदनिका खरेदीविक्रीसाठी अवसायकांची परवानगी आवश्यक

महाराष्ट्र शासनाचे ५, १३ आणि २३ वर्षे मुदतीचे अनुक्रमे ८०० कोटी, १६०० कोटी व १२०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई महापौर बंगल्यातील कर्मचाऱ्यांसोबत महापौरांनी साजरी केली ‘कृतज्ञतेची राखी’महापौर श्रीमती रितू तावडे व आमदार श्रीमती चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

भारत पर्व’महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta