vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई लोकलमधील प्राणघातक हल्ले, प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे पुलांमुळे होणारी गैरसोय आणि शेअरिंग टॅक्सीच्या मनमानी भाडेवसुलीवर कठोर उपाययोजना करा-सामाजिक कार्यकर्ते संजय रमेश भालेराव यांनी मांडले प्रवाशांच्या सुरक्षिततेचे गंभीर प्रश्न!

मुंबई लोकलमधील प्राणघातक हल्ले, प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे पुलांमुळे होणारी गैरसोय आणि शेअरिंग टॅक्सीच्या मनमानी भाडेवसुलीवर कठोर उपाययोजना करा-सामाजिक कार्यकर्ते संजय रमेश भालेराव यांनी मांडले प्रवाशांच्या सुरक्षिततेचे गंभीर प्रश्न!

 

(लोहमार्ग पोलीस आयुक्त श्री. एम. राकेश चंद्र कलासागर (आयपीएस) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक संपन्न; )डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी विशेष रेल्वे सुरक्षा व्यवस्था, तातडीची वैद्यकीय मदत आणि वाहतूक नियोजनाचा कृती आराखडा राबविण्याची मागणी!

 

मुंबई, प्रतिनिधी-मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांची सुरक्षा, लोकल गाड्यांमध्ये किरकोळ कारणांवरून धारदार शस्त्रांचा वापर करून होणारे प्राणघातक हल्ले, रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांच्या दुरुस्तीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, जखमी व बेशुद्ध प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यातील त्रुटी आणि रेल्वे स्थानकांबाहेरील शेअरिंग टॅक्सी चालकांकडून होणाऱ्या कथित अवाजवी भाडेवसुलीच्या गंभीर प्रश्नांवर लोहमार्ग पोलीस प्रशासनाच्या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा करण्यात आली.

सदर बैठक श्री. एम. राकेश चंद्र कलासागर (आयपीएस), पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्रीमती सुनीता व्ही. साळुंखे ठाकरे (आयपीएस), पोलीस उपायुक्त, पश्चिम रेल्वे, मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सदस्य श्री. संजय रमेश भालेराव यांनी रेल्वे प्रवाशांच्या जीविताशी, सुरक्षिततेशी आणि नागरी सुविधांशी संबंधित विविध गंभीर प्रश्न प्रशासनासमोर मांडून तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली.

किरकोळ वादातून चाकू हल्ले; रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता!

मुंबई लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून, चढण्या-उतरण्यावरून किंवा अन्य किरकोळ कारणांवरून होणाऱ्या वादांचे हिंसक घटनांमध्ये रूपांतर होत असल्याबाबत श्री. भालेराव यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.२३ जून २०२६ रोजी लोकलमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात एका तरुण प्रवाशाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा, तसेच १५ नोव्हेंबर २०२६ रोजी अंधेरी स्थानकाजवळ लोकलमधील वादातून फेकलेला चाकू दुसऱ्या प्रवाशाच्या छातीत घुसून तो गंभीर जखमी झाल्याच्या घटनेचा उल्लेख त्यांनी बैठकीत केला.

अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रेल्वे पोलीस (GRP), रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त गस्तीमध्ये वाढ करावी. गर्दीच्या वेळेत विशेष सुरक्षा पथके तैनात करावीत, धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि सीसीटीव्ही यंत्रणा अधिक प्रभावी करावी, अशी मागणी करण्यात आली.महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

बेशुद्ध व अत्यवस्थ प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे!रेल्वे प्रवासादरम्यान बेशुद्ध किंवा अत्यवस्थ अवस्थेत आढळणाऱ्या प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी स्वतंत्र मानक कार्यपद्धती (SOP) लागू करण्याची मागणी श्री. भालेराव यांनी केली.

संजय नानाभाऊ शिंदे या प्रवाशासंदर्भातील तक्रारीचा उल्लेख करून, एखादा प्रवासी दीर्घकाळ बेशुद्ध किंवा असहाय अवस्थेत असल्याची शंका उपस्थित होत असल्यास रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी त्याची तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रवासी बेशुद्ध अवस्थेत आढळल्यास त्याला मद्यधुंद किंवा नशेत असल्याचे गृहीत धरून दुर्लक्ष करू नये. त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करावी, प्रथमोपचार द्यावेत, रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जवळच्या रुग्णालयात दाखल करावे आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना त्वरित माहिती द्यावी.तसेच प्रत्येक लोकल गाडीच्या शेवटच्या फेरीनंतर सर्व डब्यांची तपासणी करण्यात यावी. आपत्कालीन घटनांची अधिकृत नोंद ठेवून संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी करण्यात आली.

रेल्वे पुलांच्या दुरुस्तीमुळे प्रवाशांचे हाल; सुरक्षित पर्यायी व्यवस्था करा!मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांची दुरुस्ती, पुनर्बांधणी तसेच काही पूल बंद करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे श्री. भालेराव यांनी निदर्शनास आणून दिले.विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी आणि कामगार वर्गाला स्थानकांवरील गर्दीमुळे प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे.

कोणताही पादचारी पूल बंद करण्यापूर्वी सुरक्षित पर्यायी मार्ग, दिशादर्शक फलक, पुरेशी प्रकाशव्यवस्था, गर्दी नियंत्रणासाठी कर्मचारी आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त प्रवेश व निर्गम व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.

तसेच पुलांच्या दुरुस्तीचे नियोजित वेळापत्रक आधीच सार्वजनिक करावे आणि प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने कामांचे नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.दादर मध्य, दादर पश्चिम आणि माटुंगा स्थानकांबाहेर शेअरिंग टॅक्सीच्या कथित मनमानी भाडेवसुलीवर कारवाई करा!

दादर मध्य रेल्वे, दादर पश्चिम रेल्वे आणि माटुंगा रेल्वे स्थानकांच्या बाहेर काही शेअरिंग टॅक्सी चालकांकडून प्रवाशांकडून अवाजवी रक्कम वसूल केली जात असल्याच्या तक्रारींचा मुद्दा श्री. भालेराव यांनी बैठकीत विशेषत्वाने मांडला.प्रवाशांची गर्दी, पर्यायी वाहनांची कमतरता आणि वाहतुकीच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन मनमानी भाडे आकारले जात असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

यासाठी वाहतूक पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस आणि रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष तपासणी मोहीम राबवावी. अधिकृत शेअरिंग टॅक्सी थांबे निश्चित करावेत, मंजूर भाडेदर दर्शनी भागात लावावेत आणि प्रवाशांना तक्रार करण्यासाठी प्रभावी हेल्पलाइन उपलब्ध करून द्यावी.

सर्वसामान्य प्रवासी, कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेरगावाहून मुंबईत येणाऱ्या नागरिकांची कोणत्याही परिस्थितीत आर्थिक लूट होऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली

६ डिसेंबरच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे स्थानकांवर विशेष सुरक्षा व्यवस्था करा!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर २०२६ रोजी होणाऱ्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो अनुयायी अभिवादनासाठी येणार आहेयेथेlया पार्श्वभूमीवर ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, परळ, प्रभादेवी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा.

तसेच गर्दी नियंत्रणासाठी विशेष पथके, वैद्यकीय मदत केंद्रे, रुग्णवाहिका, स्ट्रेचर, पिण्याचे पाणी, आपत्कालीन मदत कक्ष आणि प्रवाशांना मार्गदर्शन करणारे कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत.

रेल्वे प्रशासन, GRP, RPF, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य विभाग यांनी संयुक्त समन्वयाने नियोजन करून ६ डिसेंबरपूर्वी सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण कराव्यात, अशी मागणी श्री. भालेराव यांनी केली.

प्रवाशांच्या जीविताशी आणि सुरक्षिततेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही – संजय रमेश भालेराव

“मुंबईची लोकल ही लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे. किरकोळ वादातून प्रवाशांवर चाकूने हल्ले होत असतील, बेशुद्ध प्रवाशांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्याबाबत प्रश्न निर्माण होत असतील, रेल्वे पुलांच्या दुरुस्तीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असेल आणि रेल्वे स्थानकांबाहेर शेअरिंग टॅक्सीच्या नावाखाली अवाजवी भाडे वसूल होत असेल, तर या सर्व बाबींवर प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने आणि तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.प्रवाशांचे प्राण वाचविणे, त्यांना सुरक्षित प्रवासाची हमी देणे आणि त्यांचे आर्थिक शोषण रोखणे ही संबंधित प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. विशेषतः ६ डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस कृती आराखडा अमलात आणण्यात यावा.”

लोहमार्ग पोलीस आयुक्त श्री. एम. राकेश चंद्र कलासागर (आयपीएस) आणि पोलीस उपायुक्त श्रीमती सुनीता व्ही. साळुंखे ठाकरे (आयपीएस) यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मांडलेल्या सर्व गंभीर प्रश्नांवर संबंधित विभागांनी समन्वयाने तातडीची कार्यवाही करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी आग्रही मागणी श्री. भालेराव यांनी केली.बैठकीस उपस्थित मान्यवर व पदाधिकारी सदर बैठकीस श्री. नागसेन कांबळे (सरचिटणीस), श्री. प्रदीप कांबळे (भारतीय बौद्ध महासभा), श्री. संजय रमेश भालेराव (सामाजिक कार्यकर्ते), श्री. किरण अशोक निकम (वॉर्ड अध्यक्ष, प्रभाग क्र. १८९, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आठवले), श्री. रियाज, श्री. देवमणी तिवारी, श्री. जगन्नाथ जव्हार, श्री. प्रशांत दिनकर (रिपब्लिकन सेना), श्री. राहुल जाधव, श्री. राजेंद्र बी. वेते, श्री. नागेश कांबळे, श्री. रमेश मा. जाधव, श्री. सागर मा. संसारे, श्री. रवि गायकवाड, श्री. मनोज गायकवाड (पँथर संघटना) आणि श्री. सुशांत ज. उके यांची प्रमुख उपस्थिती होती.संजय रमेश भालेराव सामाजिक कार्यकर्ते ,सदस्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती माटुंगा लेबर कॅम्प, मुंबई

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षेच्या४१ परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू

भाजपा जालना महानगरात “मन की बात” कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पंतप्रधान मोदीजींच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यकर्त्यांना नवचेतना – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

सटवाई तांड्याच्या रहिवाशांच्या हक्कांसाठी मनसे आक्रमक; जागा नियमितीकरण, घरकुल मंजुरीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

📢 कृपया लक्ष द्या… वाहनचालक, प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे आवाहन..

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पदभरती

पीएम किसान सन्मान निधीचा २४ वा हप्ता पंतप्रधानाच्या हस्ते वितरित; बुलढाण्यातील ३ लाख ३६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ६७ कोटी ३६ लाख रुपये  • दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून सात हजार रुपयांचा आर्थिक आधार • कृषी विज्ञान केंद्रात थेट प्रक्षेपण• आधुनिक तंत्रज्ञान, माती परीक्षण आणि चारा नियोजनावर भर

vishwatmaklokswamivarta