vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विशेष लेखः-महात्मा जोतिराव फुले: तर्कतीर्थांच्या दृष्टिकोनातून

विशेष लेखः-महात्मा जोतिराव फुले: तर्कतीर्थांच्या दृष्टिकोनातून

विशेष प्रतिनिधी-

महात्मा जोतिराव फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर भारतीय समाजव्यवस्थेला मूलभूत प्रश्न विचारणारे क्रांतिकारक विचारवंत होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या ‘ज्योति-निबंध’ या ग्रंथातून फुल्यांच्या सामाजिक कार्याचे आणि विचारांचे चिकित्सक मूल्यमापन केले आहे.

फुल्यांच्या कार्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा बदलण्याऐवजी त्या प्रथांना जन्म देणारी विषमतेची व्यवस्थाच बदलण्याचा प्रयत्न केला.

 एकोणिसाव्या शतकात भारतीय समाज जातिभेद, अस्पृश्यता, स्त्रीदास्य आणि अज्ञानाने ग्रस्त होता. अशा परिस्थितीत फुल्यांनी शिक्षण, समता आणि विवेक यांच्या आधारे सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभारली. महात्मा फुले यांच्याबाबत अनेक लेखक, संशोधकांनी भरपूर संशोधन करुन मोठ्या प्रमाणावर साहित्यनिर्मिती केली. प्रत्येकाने आपापल्या परिने महात्मा फुल्यांच्या कार्याचे विश्लेषण , समिक्षण केले. मात्र तर्कतीर्थांनी केलेले विश्लेषण हे अत्याधिक वस्तुनिष्ठ मानावयास हवे. त्याला कारण तर्कतीर्थांची वैचारीक बैठक आणि ज्ञान परंपरेशी जोडलेली नाळ हे होय.

तर्कतीर्थांची ज्ञान परंपरा,तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे एक महान विद्वान होते. प्राज्ञ पाठशाळा वाईयेथे मोठे कार्य त्यांनी उभारले. ज्ञान आणि संशोधनाचे मोठे कार्य त्यांनी निर्माण केले. जगातील सर्व विद्याशाखांमधील ज्ञान हे मराठी भाषेत उपलब्ध व्हावे,अशीही त्यांची भूमिका होती. त्यासाठीच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना मराठी विश्वकोश मंडळाचे पहिले अध्यक्ष केले. विश्वकोशाच्या माध्यमातून सर्व विद्याशाखांचे ज्ञान मराठी भाषेतील नोंदींमधून उपलब्ध आहे.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे स्वतः पुरोगामी विचारवंत होते. त्यामुळे त्यांनी धर्मशास्त्र, संस्कृतिविषयक विविध विषयांवर विस्तृत ग्रंथसंपदा निर्माण केली. प्रत्येक कार्यामागे त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन होता. महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी जोति निबंध १९४७ मध्ये लिहिला. जोतिराव पुले भारतातील सामाजिक गुलामगिरीच्या विरुद्ध बंड पुकारणारा पहिला पुरुष असे या निबंधाचे नाव होते. तर्कतीर्थ स्वतःला बुद्धिवादी परंपरेचा अनुयायी म्हणत. ते म्हणत, ‘राममोहन रॉय, न्यायमूर्ती रानडे, जोतिबा फुले, लोकहितवादी, डॉ. भांडारकर, प्रिंन्सिपल आगरकर इ. सुधारकांनी निर्मिलेल्या बुद्धिवादी परंपरेचा मी अनुयायी आहे, आणि स्वतःस सत्यशोधकांचा चहाता समजतो’.

शिक्षणातून सामाजिक मुक्ती,महात्मा फुल्यांनी शिक्षणाला सामाजिक क्रांतीचे प्रमुख साधन मानले. ज्ञानावर कोणत्याही एका वर्गाची मक्तेदारी असू नये, ही त्यांची भूमिका होती. स्त्रिया आणि बहुजन समाजाला शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांची गुलामगिरी संपणार नाही, याची त्यांना जाणीव होती.त्यांच्या दृष्टीने शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता नव्हे, तर अन्याय ओळखण्याची आणि त्याविरुद्ध उभे राहण्याची क्षमता होय.

इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी,फुल्यांनी इतिहासाकडे राजे-महाराजांच्या दृष्टिकोनातून नव्हे, तर शोषित आणि वंचित समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिले.त्यांनी भारतीय इतिहासाची स्वतंत्र मांडणी केली. मात्र तर्कतीर्थांनी फुल्यांच्या या इतिहासदृष्टीचे महत्त्व मान्य करतानाच त्यांच्या काही ऐतिहासिक निष्कर्षांची चिकित्साही केली आहे.फुल्यांचे मोठेपण त्यांच्या प्रत्येक ऐतिहासिक निष्कर्षात नसून, इतिहासाकडे पाहण्याची नवी सामाजिक दृष्टी त्यांनी दिली, यात आहे.

सत्यशोधक समाज आणि समतेचा विचार१८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करून फुल्यांनी आपल्या विचारांना संघटित चळवळीचे स्वरूप दिले.जन्माधिष्ठित श्रेष्ठत्व, धार्मिक कर्मकांड आणि सामाजिक विषमतेला त्यांनी आव्हान दिले. प्रत्येक माणसाला समान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा त्यांच्या विचारांचा गाभा होता.फुल्यांच्या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये सत्य, नीती, विवेक आणि मानवता या मूल्यांना महत्त्व होते. धर्म हा माणसाला जोडणारा असावा, त्याच्यात भेद निर्माण करणारा नसावा, अशी त्यांची भूमिका होती.

तर्कतीर्थांचे चिकित्सक मूल्यमापन,तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी फुल्यांचा केवळ गौरव केलेला नाही. त्यांच्या विचारांचे ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन चिकित्सक विश्लेषण केले आहे.फुल्यांच्या काही ऐतिहासिक मांडण्यांशी मतभेद असले तरी त्यांनी बहुजन समाजात निर्माण केलेली जागृती, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक समतेचा आग्रह यांचे ऐतिहासिक महत्त्व तर्कतीर्थ अधोरेखित करतात

आजच्या काळातील महत्त्व,आज शिक्षणाचा प्रसार झाला, कायद्याने समानता मिळाली; तरी जातीय विषमता, अंधश्रद्धा आणि सामाजिक भेदभाव पूर्णतः संपलेले नाहीत.म्हणूनच महात्मा फुल्यांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत.फुल्यांनी आपल्याला केवळ अन्यायाविरुद्ध संघर्ष करायला शिकविले नाही, तर अन्याय निर्माण करणाऱ्या व्यवस्थेची चिकित्सा करायलाही शिकविले.महात्मा फुले यांनी भारतीय समाजाला तीन मूलभूत गोष्टी दिल्या—शिक्षणातून जागृती, विवेकातून सत्यशोधन आणि समतेतून मानवी प्रतिष्ठा.तर्कतीर्थांच्या लेखनातून स्पष्ट होते की, फुल्यांची सामाजिक क्रांती ही केवळ एका समाजघटकाच्या मुक्तीची चळवळ नव्हती, तर संपूर्ण समाजाला अधिक न्याय्य आणि मानवतावादी बनविण्याचा प्रयत्न होता.महात्मा फुल्यांचे खरे स्मरण त्यांच्या प्रतिमेच्या पूजनात नाही, तर त्यांनी मांडलेल्या समता, सत्य आणि विवेक या मूल्यांच्या आचरणात आहे.

-डॉ. मिलिंद मधुकर दुसानेजिल्हा माहिती अधिकारी, छत्रपती संभाजीनग

संदर्भः१.जोतिचरित्र, लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रथम आवृत्ती, नॅशनल बुक ट्रस्ट, इंडीया.२.ज्योति निबंध-तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी., १९४७, प्राज्ञ पाठशाळा, वाई.

०००००

संबंधित पोस्ट

विविध दुर्गा उत्सव मंडळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांच्या शिक्षण, आरोग्य व सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करा – मंत्री अतुल सावे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना, बालकांसाठी शीघ्र हस्तक्षेप केंद्रे; संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करणार

vishwatmaklokswamivarta

बलात्कार आणि हत्येसारख्या अमानुष गुन्ह्यांना कोणतीही माफी नाही. न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास बळकट करणारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपले सरकार कटिबद्ध असून, अशा नरधमीवृत्तीच्या गुन्हेगारांविरोधात कठोरात कठोर कारवाई सुरूच राहील.-उपमुख्यमंत्री  सुनेत्राताई  अजित पवार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (टर्मिनल-१) भव्य परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

जुहू चौपाटी येथे आयोजित भव्य छठपूजा-भारतीय सण आणि उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मेळघाट विकासासाठी प्रशासनातील समन्वय वाढवावा-मंत्री डॉ. अशोक उईके