
कंधारमधील तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण-शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि विकसित उद्यान नागरिकांच्या सेवेत दाखल
नांदेड, प्रतिनिधी: कंधार शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण भर घालणाऱ्या शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर विकसित उद्यानाचे लोकार्पण आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झाले.या तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे कंधार परिसरातील नागरिकांना आरोग्य, प्रशासकीय सेवा आणि मनोरंजनाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार असून, उपविभागीय अधिकारी कार्यालयामुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होणार आहे. तसेच विकसित उद्यानामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे.कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता रुपा राऊळ, उपविभागीय अधिकारी विलास नरवटे यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
०००



