vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अधिकाऱ्यांनी जनभावना जाणून काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा; राज्यस्तरीय जिल्हाधिकारी परिषद

अधिकाऱ्यांनी जनभावना जाणून काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल-विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा; राज्यस्तरीय जिल्हाधिकारी परिषद

मुंबई, प्रतिनिधी : विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करावा. ग्रामीण भागात लघुउद्योगांना प्रोत्साहन आणि रोजगारनिर्मितीला चालना देऊन नागरिकांचे जीवन सुलभ करण्यात योगदान द्यावे. भारतीय प्रशासकीय सेवेची प्रतिमा अधिक उज्ज्वल करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकांमध्ये राहून जनभावना जाणून घेऊन काम करावे, असे आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.

विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी नियोजन, विकासकामांची गती आणि प्रशासकीय यंत्रणेतील समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय जिल्हाधिकारी परिषदेत मुख्य सचिव अग्रवाल बोलत होते. या परिषदेस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले की, प्रशासकीय अधिकारी हे धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणारे घटक असून त्यांची पदस्थापना कोणत्या ठिकाणी आहे, यापेक्षा त्यांनी विकासासाठी दिलेले योगदान अधिक महत्वाचे आहे. राज्य सकल उत्पादन, वस्तू व सेवा कर संकलन आणि थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्याची ही बलस्थाने लक्षात घेऊन विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सकारात्मक आणि परिणामकारक दृष्टिकोनातून काम करणे आवश्यक आहे.

राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील बदलत्या लोकसंख्यात्मक परिस्थितीचा विचार करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील घटता जन्मदर, शाळांमधील कमी होणारी विद्यार्थीसंख्या आणि तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांचे वाढते प्रमाण या बाबी ग्रामीण विकासासाठी आव्हानात्मक ठरू शकतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामीण भागात लघुउद्योगांची उभारणी आणि विस्तार करण्यास प्रोत्साहन द्यावे. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होऊन शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधी नेहमी लोकांमध्ये असतात, त्यामुळे त्यांना वस्तुस्थिती चांगली माहिती असते. अधिकाऱ्यांनीही लोकांमध्ये जास्तीत जास्त मिसळून जनभावना समजून घ्याव्यात. मंत्रालयातील अवर सचिव, उपसचिव यांनी क्षेत्रभेटी कराव्यात, असे आवाहन करुन अधिकाऱ्यांनी जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता व्यापक दृष्टिकोन ठेवावा. त्याच वेळी तळागाळातील वस्तुस्थितीचे भानही ठेवावे, असे मुख्य सचिवांनी सांगितले. प्रशासकीय कामकाजातील औपचारिक बैठकांसाठी ऑनलाइन माध्यमांचा अधिकाधिक वापर करावा. मात्र, परस्पर समन्वय, संवाद आणि सहकार्य वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष भेटीही घ्याव्यात, असेही ते म्हणाले.

शिस्तप्रिय अधिकाऱ्याचा सन्मान होतोच,अधिकारी शिस्तप्रिय आणि सरळमार्गी असेल तर लोकप्रतिनिधीही त्याचा सन्मान करतात आणि त्याचे मत ऐकतात. त्याचप्रमाणे सक्षम अधिकाऱ्याचे मूल्य शासनही ओळखतेच, असे मुख्य सचिव अग्रवाल यांनी यावेळी सांगितले. चांगली किंवा वाईट पदस्थापना असे काही नसते, तो गैरसमज आहे, असे सांगताना त्यांनी आपले विविध कार्यक्षेत्रातील अनुभव यावेळी मांडले. कोषागार सचिव असताना धनादेश पुस्तिकांऐवजी थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयाचा पुढे देशभरातील थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) व्यवस्थेला मोठा फायदा झाला, असे त्यांनी सांगितले.महसूल विभागातील परिवर्तनात्मक सुधारणा तसेच बदलत्या काळातील जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या या विषयावर अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय सुधारणांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. बदलत्या प्रशासकीय गरजांनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नेतृत्वाची भूमिका अधिक प्रभावीपणे बजावण्याचे आवाहन त्यांनी केले.

संबंधित पोस्ट

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम मतदारांच्या सुविधेसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष व संपर्क क्रमांकांची घोषणा

बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’चा यशस्वी समारोप-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या आयोजनाने पुण्याचे नाव जगभरात पोहोचले- मंत्री चंद्रकांतदादा पाटील

vishwatmaklokswamivarta

आरसीडब्ल्यूएच्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण

आनंददायी निवृत्ती वेतन योजनेंतर्गत सेवानिवृत्त १७१ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान..

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात संपूर्ण महसुली हद्दीत आकाशात उडणाऱ्या रॉकेट व तत्सम फटाक्यांच्या वापरावर 9 नोव्हेंबर ते 8 जानेवारी या कालावधीत पूर्ण बंदी…

vishwatmaklokswamivarta

समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनकार्याबाबत संशोधन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील