
टीबीमुक्त रायगडसाठी ‘जोश’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: टीबीमुक्त भारताच्या दिशेने केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘Josh’ उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात आली तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विद्यार्थ्यांना टीबी निर्मूलनासाठी योगदान देण्याची शपथ देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने ‘Josh’ स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात आली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने ‘Josh’ उपक्रमाचे राष्ट्रीय स्तरावर उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय तसेच केंद्रीय आरोग्य सचिव यांच्या उपस्थितीत टीबीमुक्त भारताच्या अभियानात NSS व NCC विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष किशन जावळे यांच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभाग तसेच पंचायतराज संस्थांच्या प्रतिनिधींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिषा चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील आणि शिक्षणाधिकारी श्रीमती रेश्मा साळुंके यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था व संबंधित विभागांना उपक्रमाची माहिती देण्यात आली.या उपक्रमांतर्गत आजच्या दिवशीच 20 वर्ग-1 अधिकारी आणि 80 स्वयंसेवकांची ‘Josh Team’मध्ये नोंदणी करण्यात आली. टीबीमुक्त रायगड हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा उपक्रम केवळ शासकीय कार्यक्रम न राहता जनसहभागाचे प्रभावी माध्यम बनावे, यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.‘टीबीमुक्त भारत’ ॲपद्वारे सहभागी होण्याचे आवाहन
Josh Team’मध्ये सहभागी होण्यासाठी ‘टीबीमुक्त भारत’ ॲप मोबाईलच्या Play Store वरून डाउनलोड करून त्यातील ‘Josh Team’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आवश्यक माहिती भरून OTP द्वारे पडताळणी करावी व पासवर्ड सेट करून लॉगिन करावे. जिल्हास्तरावर मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रियेद्वारे स्वयंसेवक म्हणून सहभागी होता येणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन टीबीमुक्त रायगडच्या उद्दिष्टासाठी योगदान द्यावे.‘निक्षय मित्र’ बनून टीबी रुग्णांना मदत करण्याचे आवाहनजिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सभापती, सदस्य तसेच सरपंच यांनी आपल्या गावातील टीबी रुग्णांच्या उपचाराकडे विशेष लक्ष द्यावे. रुग्णांना उपचार पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देतानाच त्यांच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढाकार घ्यावा, त्यांना फूड बास्केटचे वाटप करावे तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आवश्यक आर्थिक तरतूद करावी,.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पीपीएम समन्वयक दंतराव सतीश, डॉ. सुरेश ठोकळ आणि डॉ. अक्षयराज राठोड यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्ह्यातील विविध विभाग, अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संस्था, NSS व NCC विद्यार्थी तसेच स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिषा चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.
0000



