२४ नोव्हेंबरला मुंबईत राज्यस्तरीय बुवाबाजीविरोधी महिला परिषदेचे आयोजन
खेड, प्रतिनिधी: बुवाबाजी, अंधश्रद्धा आणि त्यातून महिलांचे होणारे शोषण याविरोधात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सकाळी १० वाजता राज्यस्तरीय बुवाबाजीविरोधी महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अंनिसचे राज्य पदाधिकारी सचिन गोवळकर यांनी दिली. महिलांना बुवाबाजीच्या जाळ्यात अडकवून त्यांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करण्याच्या प्रवृत्तींना आळा घालणे, या समस्येचे सामाजिक व मानसशास्त्रीय पैलू समजून घेणे आणि महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार असून, सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.परिषदेच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिल डोंगरे यांचे ‘बुवाबाजी : बळी स्त्रियांचा, एक मानसशास्त्रीय विश्लेषण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुवाबाजीच्या मानसिकतेचा आणि त्यामध्ये महिलांना लक्ष्य केले जाण्याच्या कारणांचा वेध या व्याख्यानातून घेतला जाणार आहे.
तिसऱ्या सत्रात नव्या पिढीचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी ‘जेन-झी टॉक ऑन बुवाबाजी’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये प्रियांका खेडेकर, हरी आवळे, शितल वसावे आणि गौरी जाधव हे तरुण कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.परिषदेच्या समारोप सत्राला ज्येष्ठ साहित्यिका प्रा. नीरजा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या सत्राचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र अंनिसचे राज्याध्यक्ष माधव बावगे भूषविणार आहेत.
बुवाबाजीच्या अंधाऱ्या जाळ्यातून महिलांना बाहेर काढून त्यांना विवेक, विज्ञान आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखविण्याच्या दिशेने ही राज्यस्तरीय परिषद महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. तरी महिलांनी व नागरिकांनी मोठय़ा संख्येने या परिषदेत उपस्थित राहावे. असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य पदाधिकारी सचिन गोवळकर यांनी केले आहे