vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आर्थिक समावेशन संतृप्तता अभियानाचा 22 ऑक्टोबर रोजी पेण येथे शुभारंभ

आर्थिक समावेशन संतृप्तता अभियानाचा 22 ऑक्टोबर रोजी पेण येथे शुभारंभ

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात राबविण्यात येणाऱ्या आर्थिक समावेशन संतृप्तता अभियानाची सुरुवात 21 ऑक्टोबर 2026 पासून होणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचा शुभारंभ कार्यक्रम गुरुवार, दि. 22 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता पेण येथील मराठा समाज भवन, गणपती वाडी, पेण–खोपोली बायपास रोड, रिलायन्स कम्युनिकेशन कार्यालयामागे येथे आयोजित करण्यात आला आहे. हे अभियान 21 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी किशन जाावळे यांनी 8 ऑक्टोबर 2026 रोजी नियोजन बैठक घेऊन सहभागी बँकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. अभियानांतर्गत निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करावे, पात्र लाभार्थ्यांपर्यंत विविध आर्थिक समावेशन योजना पोहोचवाव्यात आणि अभियान प्रभावीपणे राबवावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या

या अभियानाच्या माध्यमातून पात्र नागरिकांना विविध आर्थिक समावेशन योजना आणि बँकिंग सेवांचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि अटल पेन्शन योजना (APY) यांसारख्या योजनांबाबत जनजागृती करणे आणि पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करणे ही अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

अभियानांतर्गत निष्क्रिय बँक खाती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही, आधार जोडणी, प्रलंबित पुनःकेवायसी (Re-KYC), सी-केवायसी (C-KYC) नोंदणी आणि खात्यांमध्ये नामनिर्देशन अद्ययावत करणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

याशिवाय, ‘आपली पुंजी, आपला अधिकार’ (तुमचे पैसे, तुमचा हक्क) हा उपक्रमही अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आर्थिक जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना त्यांच्या आर्थिक अधिकारांविषयी माहिती देणे यावर भर देण्यात येणार आहे. नागरिकांना डिजिटल बँकिंगचा सुरक्षित वापर आणि डिजिटल आर्थिक फसवणुकीपासून बचाव याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

पेण येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमात भारतीय रिझर्व्ह बँक, राज्यस्तरीय बँकर्स समिती, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील बँकांचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. कार्यक्रमस्थळी सहभागी बँकांचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात येणार असून, त्याद्वारे विविध बँकिंग सेवा आणि आर्थिक समावेशन योजनांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या अभियानाबाबतची माहिती जिल्हा अग्रणी व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, रायगड, श्री. सुधीर गायकवाड यांनी दिली. पात्र नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेऊन आपल्या बँक खात्यांशी संबंधित आवश्यक कामे पूर्ण करावीत आणि उपलब्ध आर्थिक समावेशन योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक कार्यालय, रायगड यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

000

संबंधित पोस्ट

जामनेरमध्ये ग्रीनफिल्ड प्रकल्पासह राज्यात १,२०० कोटी गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योगांना गती मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापनेसाठी सविस्तर प्रस्ताव तयार करा- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश· कोकणातील उच्च कृषी शिक्षणाला मिळणार नवी दिशा

महानगर प्रदेशात महिलांचा आर्थिक सहभाग वाढविण्यासाठी अभिनव प्रकल्पाचा प्रस्ताव-छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधिकरणास अर्बन रिसर्च फाउंडेशन–सेफटीपिन यांचे सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पुर्ततेसाठी 07 जुलै पर्यंत अंतिम मुदतवाढ

जिल्ह्यात 16 हजारांहून अधिक निरक्षरांनी दिली नवसाक्षरता चाचणी

vishwatmaklokswamivarta

ओबीसींच्या सर्वसमावेशक विकासावर शासनाचा भर – इतर मागास बहुजन विकास मंत्री अतुल सावे • रोजगार मिळविण्यापेक्षा रोजगार देणारे व्हा• नांदेडमध्ये ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा’ उत्साहात ..

vishwatmaklokswamivarta