बाधितांच्या प्रश्नावर समन्वयाने मार्ग काढणार – जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड
कोल्हापूर प्रतिनिधी) महालक्ष्मी मंदिर परिसर विकास आराखड्याच्या अनुषंगाने येथील जे स्थानिक मालमत्ता , व्यवसायधारक आहेत त्यांच्या प्रश्नांच्या – शंकांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे समन्वयाने योग्य तो मार्ग काढण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी शिष्टमंडळाला दिली .
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहुजी सभागृहात श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर विकास आराखडा – भूसंपादन संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी म्हणाले,या आराखड्यामध्ये भूसंपादन करण्याला प्रथम प्राधान्य असून जे व्यावसायिक बाधित झाले आहेत त्यांना व्यवसायासाठी जागा देण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रथम प्राधान्य राहील. शासन निकषांनुसार तेथील बाधितांना भूसंपादनाबाबतचा योग्य मोबदला दिला जाईल तसेच त्यांच्या मागण्या तपासून त्यावर सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले .
तर महाद्वार रोडवरील व्यवसायिकांच्या मालमत्ता या अबाधित ठेवून श्री महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास करण्यात यावा अशी मागणी यावेळी बाधितांच्या शिष्टमंडळाने केली. याप्रसंगी करवीर प्रांतधिकारी मोसमी चौगुले , जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख , जेडीआरचे तेजस इंगळे , नगर रचनाकार संदेश कुळवमोडे , रविराज पवार , पियुष जाधव यांच्यासह अंबाबाई मंदिर परिसरातील इतर बाधित व्यावसायिक व रहिवासी उपस्थित होते.