vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचे नियोजन, पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडून मोहोप्रे, दहीवड येथील बंधाऱ्यांची पाहणी श्रमदानातून उभी राहतेय जलसंधारणाची लोकचळवळ

वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचे नियोजन, पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडून मोहोप्रे, दहीवड येथील बंधाऱ्यांची पाहणी श्रमदानातून उभी राहतेय जलसंधारणाची लोकचळवळ

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच जलसंधारणाचे नियोजन सुरू करण्यात आले असून, वनराई बंधारा अभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री पालकमंत्री तथा भरतशेठ गोगावले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानाने आता लोकचळवळीचे स्वरूप धारण केले आहे. याच अभियानांतर्गत मोहोप्रे, दहीवड आणि वडवली येथील श्रमदानातून उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांची पालकमंत्री श्री.गोगावले पाहणी केली.

 

मोहोप्रे गावाच्या हद्दीत गांधारी नदीवर तसेच दहीवड, वडवली परिसरात उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांची पाहणी करताना पालकमंत्री गोगावले यांनी पाणीसाठा, जलसंधारण आणि आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपविभागीय अधिकारी महाड पोपट ओमासे, तहसिलदार महेश शितोळे, पंचायत समिती सभापती प्रेरणा सावंत, उपसभापती सुरेश महाडिक, महाडचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 

गांधारी नदीवरील बंधाऱ्यांचे विशेष कौतुक

 

गांधारी नदीवर पंचायत समितीचे उपसभापती सुरेश महाडिक यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या श्रमदानातून उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांचे पालकमंत्री गोगावले यांनी विशेष कौतुक केले. महाड आणि पोलादपूर तालुक्यांत आतापर्यंत सुमारे 30 ते 40 वनराई बंधारे उभारण्यात आले असून, या माध्यमातून पाणी अडविण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

गांधारी पुलाखाली उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे नदीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा होण्यास मदत झाली आहे. या बंधाऱ्याच्या मागील बाजूस सुमारे दोन किलोमीटरपर्यंत पाणी अडविण्यात आले असून, पाण्याची खोलीही समाधानकारक आहे. बंधाऱ्याची उंची आणखी एक फूट वाढवून सांडव्याचे नियोजन योग्य प्रकारे केल्यास एप्रिल आणि मे महिन्यातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध राहू शकतो, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

रायगडचा जलसंधारण पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला ग्रामस्थांच्या श्रमदानाची जोड मिळाल्याने वनराई बंधारा अभियान अधिक प्रभावी ठरत आहे. रायगड जिल्ह्यात या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून, वनराई बंधाऱ्यांची संकल्पना राज्यभर स्वीकारली जात असल्याचे पालकमंत्री श्री.गोगावले यांनी सांगितले.

 

भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन आतापासूनच पाणी साठविणे, उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि लोकसहभागातून जलसंधारणाची कामे वाढविणे आवश्यक आहे. वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाईवर निश्चितच मात करता येईल, असा विश्वास पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला.

 

श्रमदानातून जलसंधारण आणि लोकसहभागातून पाणी बचत हा रायगड जिल्ह्याचा नवा पॅटर्न ठरत असून, आगामी उन्हाळ्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 बंधाऱ्याला कायमस्वरूपी स्वरूप देण्याचे नियोजन

गांधारी नदीवरील या बंधाऱ्याला भविष्यात पक्के स्वरूप देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित विभागाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. बंधारा कायमस्वरूपी बांधण्यात आल्यास भरतीच्या वेळी नदीत येणारे खारे पाणी रोखण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील पाण्याचे नियोजन अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे.

0000000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यातील वादळी वाऱ्यांचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

ग्राहकांनी सजग राहून सुरक्षित व्यवहाराची सवय अंगीकारावी – न्यायाधीश सय्यद सादिक अली तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात संपन्न

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

बुलडाणा जिल्ह्यात २४ जूनअखेर सरासरी ३३.२ मि.मी. पावसाची नोंद; शेगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस

कोयना बॅक वॉटर फेस्टीव्हल विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

मुंबई महापौर बंगल्यातील कर्मचाऱ्यांसोबत महापौरांनी साजरी केली ‘कृतज्ञतेची राखी’महापौर श्रीमती रितू तावडे व आमदार श्रीमती चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा