vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सवात तरुणाईच्या कलागुणांचा उत्स्फूर्त आविष्कार;**लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, काव्यलेखन व पथनाट्य स्पर्धांना उदंड प्रतिसाद*

*रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सवात तरुणाईच्या कलागुणांचा उत्स्फूर्त आविष्कार;**लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, काव्यलेखन व पथनाट्य स्पर्धांना उदंड प्रतिसाद*

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: “युवा शक्तीच्या जागरातून विकसित महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार” हा संकल्प उराशी बाळगत रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६-२७ आज गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी नवीन पनवेल येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय (सेक्टर ६) येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.

     क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य (पुणे) यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या वतीने या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

     कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आले. तर स्पर्धेची सुरुवात प्राजक्ता कोकणे यांच्या नृत्याविष्काराने आणि जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या देशप्रेमावर आधारित, देश आणि समाजासाठी प्रोत्साहनपर “शहीद कॅप्टन विनायक गोरे” या एकपात्री सादरीकरणातून झाली.

     या सोहळ्यास जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज सुमन शिवाजी सानप आणि जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. प्रकाश वाघ यांच्यासह आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या (माध्यमिक) मुख्याध्यापिका श्रीमती रचना पाटील, प्राथमिक मराठी माध्यमच्या मुख्याध्यापिका श्रीमती निशा देवरे, इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका श्रीमती शीतल साळुंखे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी श्रीमती तपस्वी गोंधळी आणि महानगरपालिकेचे क्रीडा समन्वयक श्री. समीर रेवाळे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.

     यावेळी उपस्थित मान्यवरांसह विविध स्पर्धांच्या प्रशिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकातून युवा महोत्सवाचे महत्त्व आणि अशा व्यासपीठांच्या माध्यमातून युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मिळणारी चालना अधोरेखित करण्यात आली.

      महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये व संस्थांमधील तरुण-तरुणींनी लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, काव्यलेखन, पथनाट्य आणि निबंध या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. लोकनृत्य व लोकगीतांच्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे जिवंत दर्शन घडले; तर चित्रकला, काव्यलेखन, निबंध आणि पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने आपली सृजनशीलता, सामाजिक जाणीव आणि कलात्मक अभिव्यक्ती प्रभावीपणे मांडली. स्पर्धकांच्या या कलाविष्कारांना उपस्थित प्रेक्षक, शिक्षक आणि पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.

      स्पर्धांचे अचूक व पारदर्शक परीक्षण करण्यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ परीक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये काव्यलेखन स्पर्धेसाठी श्रीमती योगिनी वैदू, श्रीमती माधवी मोतीलिंग व श्रीमती शुभांगी म्हात्रे; लोकनृत्य स्पर्धेसाठी श्री. राहूल सोनावणे, श्रीमती प्राजक्ता कोकणे व श्रीमती मिताली म्हात्रे; लोकगीत स्पर्धेसाठी श्रीमती सुवर्णा बोरसे, श्रीमती प्रतिमा भालोदकर व श्री. राहूल सोनावणे; पथनाट्य स्पर्धेसाठी श्री.बाबा कांदळगावकर, श्री. सुनील भारतीय व श्रीमती सायली पावसकर; चित्रकला स्पर्धेसाठी श्रीमती मुन्निकुमारी मिनू, श्री. नितीन केणी व श्रीमती स्वाती नागे; तर निबंध स्पर्धेसाठी डॉ. दिपक गायकवाड, श्री. प्रवीण गायकर व श्री. प्रदिप गोगटे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

      परीक्षकांच्या निकालानंतर विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. हा महोत्सव ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत युवकांना जिल्हा स्तरावरून थेट विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणारा ठरला, अशा शब्दांत मान्यवरांनी स्पर्धकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

     जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. प्रकाश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड येथील तालुका क्रीडा अधिकारी व शिवछत्रपती पुरस्कारार्थी श्रीमती अंकिता मयेकर, क्रीडा अधिकारी डॉ. सुचिता ढमाले-काणे, सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी व शिवछत्रपती पुरस्कारार्थी श्री. संदीप गुरव, सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी व आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री. देविदास पाटील, क्रीडा मार्गदर्शक श्रीमती भक्ती तिवारी, आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीमती पौर्णिमा सकपाळ, तसेच लिपिक श्री. अमोल शेळके व श्री. प्रफुल्ल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

  उपस्थित मान्यवर, स्पर्धक, प्रशिक्षक व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानून या प्रेरणादायी युवा महोत्सवाची सांगता करण्यात आली.

00000000000

संबंधित पोस्ट

आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा दिलासा! मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत दोन ठिकाणी चरणसेवा उपक्रमांचे आयोजन

शोषितांच्या हक्कासाठी अण्णाभाऊंचे विचार प्रेरणादायी: सतीशराव घाटगे,अंतरवाली टेंभी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती सोहळा उत्साहात..

बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला पोलिसांनी केली अटक, राहत्या घरातच मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या,मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ..

शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

कुणबी जात प्रमाणपत्रःनागरिकांना मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन