vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गरीब रुग्णांची सेवा हीच ईश्वरसेवा समजून प्रामाणिकपणे काम करा – मंत्री हसन मुश्रीफ आरोग्य विभागात नव्याने नियुक्त २६३ गट-ड कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेशांचे वितरण

गरीब रुग्णांची सेवा हीच ईश्वरसेवा समजून प्रामाणिकपणे काम करा – मंत्री हसन मुश्रीफ,आरोग्य विभागात नव्याने नियुक्त २६३ गट-ड कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेशांचे वितरण

सांगली, प्रतिनिधी : शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे गरीब व गरजू रुग्ण यांची सेवा करण्याची संधी ही ईश्वरसेवेप्रमाणेच आहे. त्यामुळे नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी संवेदनशीलतेने वागून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे नियमित गट-ड (वर्ग-४) संवर्गातील सरळसेवा पदभरती प्रक्रियेतून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी मंत्री तथा आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सुधीर गाडगीळ, माजी खासदार संजय पाटील, समित कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रियांका राठी, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रूपेशकुमार शिंदे, डॉ. विकास देवकारे यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आरोग्य विभागातील गट-ड संवर्गाची भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली असून, सांगली जिल्ह्यात आरोग्य विभागात 263 उमेदवारांना शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळाली आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सध्याच्या काळात शासकीय आणि त्यातही कायमस्वरूपी नोकरीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ही नोकरी मिळणे ही अभिमानाची आणि जबाबदारीची बाब आहे. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह होता. गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड व्हावी, यासाठी टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल या संस्थांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेतून गुणवत्तेच्या आधारावर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देताना समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाचे सामाजिक महत्त्व ओळखून जबाबदारीने सेवा बजावावी. शासकीय रुग्णालयांमध्ये प्रामुख्याने गरीब, गरजू आणि सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी येतात. अशा रुग्णांना चांगली सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे. रुग्णांशी आपुलकीने व संवेदनशीलतेने वागावे. तसेच आपल्याला घडविण्यासाठी आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांच्या सेवेकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार इद्रिस नायकवडी आणि आमदार सुधीर गाडगीळ यांनी या रुग्णालयांमधील सोयी-सुविधा वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. शासनाचा निधी तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लागली असून, लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयांच्या विकासाला गती मिळाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मिरज हे पूर्वीपासूनच वैद्यकीय उपचारांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील मिशन हॉस्पिटलची देशभरात ख्याती होती. देश-विदेशातून रुग्ण उपचारासाठी मिरज येथे येत असत. या वैद्यकीय परंपरेचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत. रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्या पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही देऊन मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मिरज व सांगली येथील शासकीय रुग्णालयांमध्ये एमआरआय आणि सीटी स्कॅनसारख्या अत्याधुनिक तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देऊ. कॅथलॅब सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून जालना जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना केली 

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे पैसे जमा होणार ; राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय ! सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना, 36 हजार 500 कोटी रुपयांचे वितरण..

vishwatmaklokswamivarta

विभागीय माहिती कार्यालयाच्या हिंद-दी-चादर निबंध व घोषवाक्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

अमृत उद्योग कौशल्यवर्धन दहा दिवसीय प्रशिक्षणास नांदेडमध्ये उत्साहात प्रारंभ

राधानगरीला मेडिकल व टुरिझम हब बनवणार* *-सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर• *आरोग्य संवाद यात्रा आरोग्य विभागाच्या कामातील मैलाचा दगड ठरेल राज्याच्या पर्यटन नकाशात राधानगरीची वेगळी ओळख निर्माण होईल•ग्रामीण रुग्णालयात 2 डी इको कार्डिओग्राफी सेवेचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण*

vishwatmaklokswamivarta