गडचिरोली, प्रतिनिधी) : गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामातील पीक विविधीकरणाला चालना देण्यासाठी कृषी विभागाने यंदा २,५५५ हेक्टर क्षेत्रावर मोहरी पिकाच्या लागवडीचे नियोजन केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, भात कापणीनंतर पडीक राहणाऱ्या जमिनीचा उत्पादक वापर करून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात भात हे प्रमुख पीक असून, खरीप हंगामातील भात कापणीनंतर अनेक भागांत शेतजमीन पडीक राहते. अशा जमिनीवर रब्बी हंगामात मोहरीसारख्या तेलबिया पिकाची लागवड केल्यास उपलब्ध शेतीक्षेत्राचा अधिक प्रभावी वापर होण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर पारंपरिक पीक पद्धतीला पर्याय उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लागण्याची अपेक्षा आहे
या उपक्रमांतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये मोहरी लागवडीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मोहरी पिकासाठी योग्य वाणांची निवड, बियाण्यांची उपलब्धता, पेरणी पद्धती तसेच लागवड तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. संबंधित तालुक्यांतील कृषी अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून इच्छुक शेतकऱ्यांशी संपर्क साधून लागवडीसाठी क्षेत्र निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे.
मोहरी हे तुलनेने कमी कालावधीत येणारे तेलबिया पीक असल्याने रब्बी हंगामात उपलब्ध जमिनीचा उपयोग करण्यासाठी हा एक पर्याय ठरू शकतो. या उपक्रमामुळे जिल्ह्यात तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढविण्यासह स्थानिक तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे
*नियोजित क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न*जिल्ह्यात निर्धारित २,५५५ हेक्टर क्षेत्रावर मोहरीची पेरणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून नियोजन व क्षेत्रीय स्तरावरील कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची उपलब्धता आणि स्थानिक कृषी परिस्थिती विचारात घेऊन रब्बी हंगामात मोहरी लागवडीसाठी पुढाकार घ्यावा. तसेच आवश्यक तांत्रिक मार्गदर्शनासाठी संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.जिल्ह्यातील उपलब्ध शेतीक्षेत्राचा उत्पादक वापर वाढविणे, तेलबिया उत्पादनाला चालना देणे आणि शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे पर्याय निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी कळविले आहे.