
शासकीय आयटीआय चिखली येथे दीक्षांत समारंभ; गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव
बुलढाणा, द प्रतिनिधी: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), चिखली येथे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले-पाटील होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, आयएमसी अध्यक्ष सुधीरभाऊ तांबट, आयएमसी सदस्य भिकाजी पाटील, प्रा. मिलिंद हिवाळे, नगरसेवक विजय वाळेकर, सिद्धू ठेंग तसेच संस्थेचे प्राचार्य आर. टी. शेगोकार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना दीक्षांत समारंभाची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. प्रशिक्षणार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेत प्रगती साधावी, अशा उद्देशाने हा समारंभ आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला संस्थेतील सर्व निदेशक, कार्यालयीन कर्मचारी, शिपाई वर्ग, प्रशिक्षणार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल अंभोरे सर व नयन नवलखे मॅडम यांनी केले, तर जी. बी. घुगे सर यांनी आभार प्रदर्शन केले.
000



