प्रत्येक ग्रामपंचायतीत उभारणार डिजीटल इंडिया सेवा केंद्र-केंद्र शासनाचा पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित…
राज्य प्रतिनिधी -छत्रपती संभाजीनगर,- केंद्रशासनाच्या इलेक्र्टॉनिक व सुचना प्रौद्योगिकी मंत्रालयाच्या वतीएन डिजीटल इंडिया आपले सेवा केंद्र (DICSC- Digital India Common Service Centre) हा नवीन पथदर्शी प्रकल्प राज्यातून एकमेव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती मोबाईल व्हॅनला आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
सद्यस्थितीत हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प म्हणून देशभरात १० जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्रातून छत्रपती संभाजीनगर या एकमेव जिल्ह्याचा समावेश आहे. या प्रकल्पात प्रत्येक ग्रामपंचायतीत एक डिजीटल इंडीया सेवा केंद्र बनविण्यात येणार आहे. त्यात जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात एक अत्याधुनिक सुगम्य असे सेवा केंद्र बनविण्यात येणार आहे. असे केंद्र बनविण्यासाठी संबंधित सेंटर चालकाकडील एकूण आवागमनाचा आधार घेतला जाणार आहे. त्यानुसार निवड करुन असे केंद्र उभारण्यात येईल. या केंद्राची उभारणी करतांना त्यात दिव्यांग व्यक्तिंना सुकर असणारे केंद्र बनविण्यात येणार आहेत.या केंद्रांवर बॅंक ग्राहक सेवा केंद्र, आधार अद्यावतीकरण केंद्र यांचीही सेवा उपलब्ध असेल.
या प्रकल्पाबद्दल जनमानसात जागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्व ८७० ग्रामपंचायतीत एक डिजीटल प्रचार रथ फिरणार आहे. एका दिवसात पाच ग्रामपंचायतींना हा रथ भेट देणार आहे. या प्रचार रथात सुद्धा आधार अद्यावतीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिवाय विविध योजनांचा प्रचार, एलईडी स्क्रीनवर फिल्म्स दाखवून करण्यात येणार आहे. एक आधार संच आणि एक कर्मचारी या वाहनासोबत आहे. ज्या ज्या गावात हा रथ जाईल तेथे लोकांनी आपले आधार अपडेट करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज या रथाला हिरवी झेंडी दाखवितांना केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून आज हा रथ रवाना झाला. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, तहसिलदार पल्लवी लिगदे, जिल्हासमन्वयक प्रशांत तमखाने, शुभम सोनवणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.०००००