जागतिक हिवताप दिनी नवी मुंबईत जनजागृती शिबिरांचे आयोजन
आरोग्य प्रतिनिधी –
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि. 25 एप्रिल रोजी नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने ‘जागतिक हिवताप दिन’ निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सन 2026 च्या जागतिक हिवताप दिनाचे ‘हिवताप दुरिकरणासाठी कटिबद्ध : आता हे शक्य आहे. आता हे केलेच पाहिजे’ – हे घोषवाक्य जाहीर करण्यात आलेले आहे. दि. 25 एप्रिल 2026 रोजी जागतिक हिवताप दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय शिबीरांचे आयोजन करुन हिवताप व साथरोग आजारांबाबत जनजागृती करण्यात आली.
यामध्ये ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने तसेच डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून, घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने दाखवून, जनजागृती करण्यात आली. यासोबत उष्णतेच्या लाटेमध्ये होणारे परिणाम व घ्यावयाची दक्षता, तसेच येणा-या पावसाळा कालावधीमध्ये साथीचे आजार टाळण्याकरिता घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली. त्याकरिता एकूण 25 शिबीरांचे आयोजन करुन 10873 नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
यामध्ये विशेष बाब म्हणून दैनंदिन जॉगींग किंवा मॉर्निंग वॉकसाठी नागरिक जातात अशा ठिकाणी ज्वेल ऑफ नवी मुंबई, राजीव गांधी जॉगर्स पार्क, सेक्टर-10, वाशी आणि निसर्ग उद्यान, से-14, कोपरखैरणे येथे सकाळी 6:00 ते 10:00 या वेळेत शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी 1905 नागरिकांना माहिती देण्यात आली.
याशिवाय दिनांक 25/4/2026 रोजी नेरुळ, वाशी व ऐरोली सार्वजनिक रुग्णालय येथे जनजागृती शिबिरांसोबतच पथनाट्य सादरीकरण केले असून सदरची पथनाटये यापुढे दिनांक 5 मे 2026 पर्यंत एकूण 31 ठिकाणी करण्यात येणार आहेत.
तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कर्मचारी यांनी आपले घर व कार्यालय डासउत्पत्ती मुक्त ठेवण्याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. दिनांक 25 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर खाजगी वैद्यकिय व्यवसायिक व रुग्णालयधारक यांची सभा घेण्यात येणार आहे.
तरी हिवताप / डेंग्यूसाठी कारणीभूत ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्ती घरांमध्ये व घराभोवतालीच्या स्वच्छ पाण्यात होत असल्याने नागरिकांनी सर्व पाण्याचे साठे झाकून ठेवले व घराबाहेरील / टेरेसवरील भंगार नष्ट केले तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू आजारांवर आळा घालणे शक्य होईल. यासाठी नवी मुंबईकर नागरिकांनी हिवताप दूरिकरणासाठी कटिबद्ध झाले पाहिजे, आता डासउत्पत्ती स्थाने नष्ट करणे शक्य आहे आणि आता हे केलेच पाहिजे अशी प्रत्येक नवी मुंबईकरांनी मनोमन प्रतिज्ञा घेऊन नमुंमपास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.