vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केली लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी**पाणी व चारा टंचाई, रोजगाराबाबत शेतकऱ्यांशी संवाद*

माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केली लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी**पाणी व चारा टंचाई, रोजगाराबाबत शेतकऱ्यांशी संवाद*

लातूर, प्रतिनिधी : माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथे केळी बागेची, तसेच नायगाव येथे व्हीबी-जी रामजी योजनेंतर्गत सुरू असलेल्या पांदण रस्ता कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी, मजुरांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच शेतीचे नुकसान, पाणीटंचाई, चारा व रोजगाराविषयी माहिती घेतली.

याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आदी यावेळी उपस्थित होते.

नायगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना राज्यपाल म्हणाले की, यावर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, या परिस्थितीत प्रत्यक्ष शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणे हे आपले कर्तव्य आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन विविध माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करत आहे, ही समाधानकारक बाब आहे. व्हीबी-जी रामजी योजनेतून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्य शासनाने हाती घेतलेल्या नदीजोड प्रकल्पामुळे भविष्यात पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना होण्यास मदत होईल. शासन, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न केल्यास दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दुष्काळाच्या या संकटात सरकार सर्व पातळीवर काम करत असून दुष्काळ निवारणासाठी करण्यात येत असलेल्या तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये नागरिकांनीही सहभागी व्हावे. सरकार आणि समाजाने एकजुटीने काम केल्यास कोणत्याही संकटावर मात करणे, यातून बाहेर पडण्यासाठी मदत होईल. या संकटकाळात आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत, अशा शब्दात माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

लातूर जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन होते, मात्र यंदा अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या संकटकाळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी, पीक विमा भरपाई मिळावी, यासाठी पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे असून या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र व राज्य शासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्यात येत आहेत, असे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करून जलसाठा वाढविण्यासह आणि भूजल पुनर्भरणासाठीही प्रयत्न सुरु आहेत. या दुष्काळाच्या संकटाचा सामना सर्वजण मिळून करूया. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कितीही संकटे आली तरी खचून न जाता लढण्याची शिकवण दिली आहे, ही शिकवण लक्षात ठेवून या संकटाचा एकजुटीने करूया, एकमेकांना मदत करून या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन आपल्या सोबत आहे, अशी ग्वाही पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

दुष्काळाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज्यपाल महोदय स्वतः चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर आले, याबद्दल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले. तसेच, यंदाचा दुष्काळ अधिक भीषण स्वरूपाचा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस पावले उचलली आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकरच प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज देण्याचे निर्देश बँकांना दिले असल्याचे सहकार मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

यंदा तीव्र पाण्याची टंचाई असून चारा टंचाईचे मोठे संकट निर्माण झाली आहे. पशुपालकांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच अवैध सावकारीविरोधात कठोर पावले उचलली जात असल्याचे सहकारमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

*लाभार्थ्यांना विविध योजनांच्या मंजुरी आदेशांचे वितरण*यावेळी माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश, प्रमाणपत्रांचे व प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले. यामध्ये व्हीबी-जी राम जी योजना, चारा लागवडीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून बियाण्यांचे वाटप, ट्रॅक्टर, कडबाकुट्टी यंत्राचे मंजुरी आदेश, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना मंजुरी पत्रे, अवैध सावकारीच्या कब्जातून मुक्त झालेल्या जमिनीचा सातबारा सुपूर्द करणे आदी बाबींचा यामध्ये समावेश होता

*रोहयो मजुरांची आस्थेवाईकपणे विचारपूस*माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नायगाव येथे व्हीबी- जी राम जी अंतर्गत सुरू असलेल्या पाणंद रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी तिथे काम करणाऱ्या मजुरांची माननीय राज्यपाल यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच जिल्ह्यात व्हीबी-जी राम जी अंतर्गत रोजगार हमीची किती कामे सुरू आहेत, कोणकोणत्या कामांना प्राधान्य दिले जात आहे, याबाबत प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली.

****

संबंधित पोस्ट

एमपीएससीकडून ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द

फटाके फोडल्यामुळे होणारे वायू व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ‘तक्रार निवारण यंत्रणा’ कार्यान्वित;उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे स्तरावर संपर्क सुविधा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

मुलांना आळशी बनवू नका, मुलांना प्रयत्नशील बनवा- प्रा.डॉ. गणेशजी अग्निहोत्री श्री एम.एस. जैन इंग्लिश स्कूल मध्ये “भारत कल, आज और कल” वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

नांदेडच्या भूमीवर होणारा शहीदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक: मुख्यमंत्री भगवंत मान

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय: दिवाळीनिमित्त स्थानिक सुट्टीत बदल; ६ नोव्हेंबरऐवजी आता ९ नोव्हेंबरला सुट्टी

vishwatmaklokswamivarta