vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विभागीय व जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,विभागीय व जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण

नागपूर, प्रतिनिधी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांनी दिलेला ग्रामविकासाचा मंत्र मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरविण्याचे काम सुरू आहे. या अभियानामुळे ग्रामीण महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा मिळत असून गावांच्या विकासाची चळवळ उभी राहत आहे. आगामी काळात हवामान बदल, घटती भूजल पातळी आणि पाण्याचा वाढता वापर लक्षात घेऊन प्रत्येक गावाचा जलसुरक्षा आराखडा तयार करण्यावर भर द्यावा. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात जलसुरक्षेला महत्त्वाचा निकष बनविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत रेशीम बाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आ. सुधाकर अडबाले, आ. डॉ. राजीव पोतदार, आ. चरणसिंग ठाकूर, आ. करण देवतळे, माजी आमदार टेकचंद सावरकर, ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले, अभियान गावागावांत पोहोचले असून विकासाचा नवा संकल्प निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतींची पुरस्कारांसाठी निवड अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांनी स्वच्छता, श्रमदान आणि ग्रामविकासाचा विचार दिला. हा विचार प्रत्येक गावात प्रत्यक्ष कृतीत आणण्याची आवश्यकता आहे. गावांचा विकास करताना भविष्यातील पाणीटंचाई आणि पर्यावरणीय आव्हानांचाही विचार व्हावा. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक गावाने जलस्रोतांचे संवर्धन करून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.ग्रामविकासाच्या चळवळीत लोकसहभाग महत्त्वाचा – मंत्री जयकुमार गोरे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडविण्याचे उद्दिष्ट आहे. शहरांप्रमाणेच गावांचाही विकास होणे आवश्यक आहे. अभियानात राज्यातील ५ हजार ६४४ गावांनी सहभाग घेतला आहे. या अभियानांतर्गत विविध शासकीय योजना राबविण्यात आल्या. ४ हजार १८ ग्रामपंचायतींच्या या अभियानात वेबसाईटस तयार झाल्या असून ४ हजार ४७ गावांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. ५ हजार १५८ ग्रामपंचायतींनी विविध सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. गावांमध्ये व्यायामशाळा मुलींसाठी शाळांमध्ये शौचालयांची सुविधा निर्माण झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून ३ लाख ६० हजार घरे पूर्ण झाली आहेत. अनेक कामे लोकवर्गणीतून झाली आहेत. या अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा असून प्रत्येक ग्रामपंचायतीने अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी व्हावे, असे आवाहन यांनी यावेळी केले

ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे अभियानाला बळ मिळाल्याचे सांगितले. विविध शासकीय योजनांची सांगड घालून गावांचा सर्वांगीण विकास साधण्याची संकल्पना आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात शंभर टक्के ग्रामपंचायतींचा सहभाग अपेक्षित आहे. वनराई बंधारे उभारणे, जलस्रोत पुनर्जीवित करणे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे ते म्हणाले.ॲड. आशिष जयस्वाल यांनी ग्रामविकासासाठी नागरिकांनी कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. गावांमधील प्लास्टिकचा वाढता वापर रोखणे, जलसंधारण करणे, बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. गाव विकसित झाले तर देश विकसित होईल, असेही ते म्हणाले.

ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार यांनीही आपले विचार यावेळी व्यक्त केले. नागपूर विभागाच्या अपर आयुक्त (विकास) वर्षा गौरकर यांनी अभियानाची संकल्पना आणि विभागीय कामांचे सादरीकरण केले.

या ग्रामपंचायतींना मिळाला पुरस्कारजिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये नागपूर जिल्ह्यातील तरोडी बु. (ता. कामठी) ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत ५० लाख रुपये, टाकळघाट (ता. हिंगणा) ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांकासह ३० लाख रुपये, तर नयाकुंड (ता. पारशिवनी) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांकासह २० लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विभागस्तरीय पुरस्कारांमध्ये धानला (ता. मौदा, जि. नागपूर) ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकासह एक कोटी रुपये, खैरी व कलमाझरी (ता. साकोली, जि. भंडारा) ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांकासह ७० लाख रुपये, तर सिरेगाव बांध (ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांकासह ६० लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विजेत्या ग्रामपंचायतींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

0000

संबंधित पोस्ट

मावळातील प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी आदेश लागू; ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू पर्यटकांनी सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

पुस्तकांचे गाव’ उपक्रमासाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावेत – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

वैज्ञानिक माहितीचा विविध विभागांनी प्रभावीपणे उपयोग करावा–जिल्हाधिकारी किशन जावळेकेंद्रीय भूजल मंडळातर्फे अहवाल सादरीकरण व माहिती प्रसार कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाला राज्यात ‘ई-गव्हर्नन्स’ मध्ये तृतीय क्रमांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

भारताच्या भविष्यातील विकासाचे मुख्य केंद्र नवी मुंबईच*”मेघालय भवन” विकास संस्कृती आणि एकात्मतेचा संगम-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*’मेघालय भवन’ उभारणीसाठी जमीन हस्तांतरण व भूमीपूजन सोहळा संपन्न*

जिल्ह्यात 14 ठिकाणी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्यांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta