vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

संविधान दिन विशेष लेख)-संविधान : लोकशाहीचा आत्मा, सामाजिक न्यायाचा आधार

संविधान दिन विशेष लेख)-संविधान : लोकशाहीचा आत्मा, सामाजिक न्यायाचा आधार

विशेष प्रतिनिधी

        भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचं पुस्तक नाही. तर ते या देशाचा आत्मा आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय हे केवळ प्रस्तावनेतले शब्द नाहीत ती आपल्या जगण्याची मूल्यं आहेत. विविध भाषा, धर्म, जाती, संस्कृती असलेला आपला देश एकसंध कसा राहिला? याचं उत्तर आपणाला संविधानात सापडतं. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारे संविधान म्हणजे आपल्या लोकशाहीचा खरा मूलाधार आहे. संविधान निर्मितीचा प्रवास,   १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण खरं आव्हान त्यानंतर सुरू झाले. राजकीय स्वातंत्र्याचे रूपांतर सामाजिक आणि आर्थिक न्यायात कसं करायचं? हा प्रश्न संविधान सभेसमोर होता. त्या काळाचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा त्या सभेच्या गांभीर्याची जाणीव होते. ९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समिती स्थापन झाली आणि तिच्या अध्यक्षपदी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती झाली.

  सुमारे दोन वर्षे, अकरा महिने, आठरा दिवस चाललेल्या चर्चेनंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारलं गेलं आणि २६ जानेवारी १९५० रोजी ते अंमलात आलं.   संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय भारतीय संविधानाची कल्पनाच अपूर्ण आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जगभरातील घटनांचा अभ्यास केला, पण त्यांनी तो अभ्यास भारतीय समाजाच्या वास्तवाशी जोडला. त्यांच्यासाठी संविधान म्हणजे केवळ कायदे नव्हते. विषमता, अस्पृश्यता, जातिभेद यातून मुक्त होऊन प्रत्येकाला समान संधी मिळावी, ही त्यांची भूमिका होती. शिक्षण, स्वाभिमान, समता आणि बंधुता यावर समाजाची पुनर्रचना व्हावी, असा त्यांचा कटाक्ष होता. त्यांची एक गोष्ट कायम लक्षात राहते – लोकशाही ही केवळ निवडणुकांपुरती नसावी, ती आपल्या सामाजिक जीवनातही रुजली पाहिजे.”लोकशाही ही केवळ शासनपद्धती न राहता, ती सामाजिक जीवनाचा भाग झाली पाहिजे,” हा त्यांचा विचार आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतो.

संविधानाची उद्देशिका (प्रस्तावना) – एक जिवंत दर्शन,  ‘आम्ही भारताचे लोक…’ हे सुरुवातीचे शब्द वाचताना नेहमीच अभिमान वाटतो; कारण देशाची सर्वोच्च सत्ता कोणा एका व्यक्तीत किंवा वर्गात नसून, ती देशातील सर्व जनतेमध्ये सामावलेली आहे, हे यातून स्पष्ट होते. भारत एक ‘सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य’ घडवण्याचा निर्धार या उद्देशिकेत आहे. सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता आणि व्यक्तिप्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता ही मूल्ये केवळ पुस्तकात ठेवण्यासाठी नाहीत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे, हेच खरे संविधान पालन आहे.

अधिकार आणि कर्तव्ये – एकाच नाण्याच्या दोन बाजू- संविधानाने आपल्याला समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, धर्मस्वातंत्र्याचा आणि शिक्षणाचा असे मौलिक अधिकार दिले आहेत. पण त्याचबरोबर भारतीय नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांचीही जाणीव करून दिली आहे. संविधानाच्या भाग ४-अ मधील अनुच्छेद ५१ (क) मध्ये नमूद केलेली मूलभूत कर्तव्ये ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. संविधानाचा आदर करणे, राष्ट्राची एकता व अखंडता जपणे, बंधुभाव वाढवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे ही आपली कर्तव्ये आहेत. अधिकार आपल्याला सक्षम बनवतात, तर कर्तव्ये आपल्याला जबाबदार बनवतात. या दोन्हीचा समतोल साधला तरच आपली लोकशाही अधिक सुदृढ होईल.

संविधान का अधिक महत्त्वाचं वाटतं? आज आपल्यासमोर अनेक आव्हानं आहेत – विषमता, सामाजिक तेढ, पर्यावरणाचं संकट. अशा वेळी संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्यं अधिकच जवळची वाटतात. संविधान दिन म्हणजे केवळ प्रस्तावनेचं वाचन किंवा शपथ नाही. तो आपल्या आचरणाचा दिवस आहे. जात, धर्म, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन प्रत्येकाचा सन्मान करणं, महिलांना समान संधी देणं, वंचितांना मुख्य प्रवाहात आणणं – हीच खरी बांधिलकी आहे.   या २६ नोव्हेंबरला एक संकल्प करूया – संविधानातील मूल्यं आपल्या विचारात, कृतीत आणि व्यवहारात रुजवायची. कारण संविधान जपणे म्हणजे लोकशाही जपणे, समता जपणे म्हणजे मानवी प्रतिष्ठा जपणे आणि बंधुता जपणे म्हणजे राष्ट्राची एकता दृढ करणं होय. संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान आणि कर्तव्यपालनातून राष्ट्रनिर्माण – हाच आपल्या सर्वांच्या मते संविधान दिनाचा खरा संदेश आहे.   –

वर्षा पाटोळे, उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

संबंधित पोस्ट

चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

रोममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट,भारत-इटली संबंधांची वाढती व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित अनेक महत्त्वपूर्ण करार यावेळी आदान-प्रदान करण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर-पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण 

vishwatmaklokswamivarta

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम – अश्विनी भिडे

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा रंगमंच सज्ज !प्रथम क्रमांकाच्या विजेत्या एकांकिकेला ३ लाखांचे पारितोषिक महाराष्ट्रातील ७१ संघांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचं नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे निर्देश.

vishwatmaklokswamivarta