हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा रंगमंच सज्ज !प्रथम क्रमांकाच्या विजेत्या एकांकिकेला ३ लाखांचे पारितोषिक महाराष्ट्रातील ७१ संघांचा सहभाग
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा रंगमंच सज्ज !प्रथम क्रमांकाच्या विजेत्या एकांकिकेला ३ लाखांचे पारितोषिक महाराष्ट्रातील ७१ संघांचा सहभाग
ठाणे प्रतिनिधी- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील कलाप्रेमी आणि नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरीय भव्य एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ठाणे आर्ट गिल्ड (TAG), स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आणि आनंद सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एकांकिका स्पर्धांच्या इतिहासातील सर्वाधिक पारितोषिक रकमेची ही स्पर्धा ठरणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला अभिनेते उदय सबनीस, अभिनेत्री संपदा जोगळेकर, दिग्दर्शक रवी जाधव, दिग्दर्शक विजू माने, अभिनेते मंगेश देसाई, TAG संस्थेचे अध्यक्ष महेश शानभाग, स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानचे मकरंद तोरस्कर, महेश राजदेरकर यांच्यासह रंगभूमीवरील मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२६ या कालावधीत ठाण्यातील काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर येथे पार पडणार असून, अंतिम फेरी ६ डिसेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल ७१ संघांनी सहभाग नोंदवला असून, त्यापैकी २५ संघ ग्रामीण भागातील आहेत. अकोला, अहमदनगर, कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कलाकार आपली कला सादर करणार असल्याने या स्पर्धेतून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी भरघोस पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकाच्या एकांकिकेला ३ लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला २ लाख रुपये, तर तृतीय क्रमांकाला १ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय उत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यासाठी प्रथम क्रमांकाला ५० हजार रुपये आणि द्वितीय क्रमांकाला २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य आणि प्रकाशयोजना अशा तांत्रिक विभागांतील उत्कृष्ट कामगिरीसाठीही प्रत्येकी २५ हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहे अशी माहिती विजू माने यांनी दिली.
एकांकिका क्षेत्रात सातत्याने आणि निष्ठेने काम करणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यासाठी ‘कालगंध’ पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबाबत माहिती देताना अभिनेत्री संपदा जोगळेकर यांनी सांगितले की, एकांकिका क्षेत्रात अनेक कलाकार कोणत्याही मोठ्या प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सातत्याने संघर्ष करत असतात. अशा कलाकारांच्या योगदानाची दखल घेणे हा या पुरस्कारामागील उद्देश आहे. यापूर्वी दिग्दर्शक अभिजित जुंझारराव, नेपथ्यकार सुमित पाटील आणि योगिता तांबे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा लवकरच करण्यात येणार असून, पुरस्काराची रोख रक्कम एक लाख रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली.
एकांकिका स्पर्धा म्हणजे कलाकारांसाठी मोठी संधी,एकांकिका आणि राज्य नाट्य स्पर्धा या कलाकारांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. केवळ पारितोषिक मिळवणे नव्हे, तर स्पर्धेत सहभागी होणे, विविध कलाकारांचे प्रयोग पाहणे आणि परीक्षकांकडून मिळणारे मार्गदर्शन आत्मसात करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आज रंगभूमीवर नाव कमावलेल्या अनेक कलाकारांचा प्रवास एकांकिका स्पर्धांमधूनच सुरू झाला आहे. प्रायोगिक रंगभूमीला खरा आधार हा प्रेक्षकांचाच असतो. गेल्या १४ वर्षांपासून TAG संस्थेमार्फत दर महिन्याला प्रायोगिक नाटकांचे आयोजन करून प्रेक्षकसंस्कृती वाढविण्याचे काम केले जात आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांनी प्राथमिक फेरीला आवर्जून उपस्थित राहावे. प्राथमिक फेरीतील सादरीकरण, तयारी आणि स्पर्धेचे स्वरूप प्रत्यक्ष पाहिल्यास कलाकारांना पुढील वाटचालीसाठी निश्चितच मार्गदर्शन मिळेल, असे आवाहनही करण्यात आले.
एकूणच, बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ही स्पर्धा महाराष्ट्रातील नवोदित आणि प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकारांसाठी मोठी संधी ठरणार असून, ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा रंगमंचीय महोत्सव ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.