रावणाचे महिमामंडन आणि प्रभु श्रीरामांचा अपमान करणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाविरोधात दादर, मुंबई येथे आंदोलन,आक्षेपार्ह दृश्ये हटवून चित्रपटाची पुनर्तपासणी करण्याची मागणी ! निशस्त्र रावण हजारोंशी लढतो; शस्त्रधारी श्रीराम-लक्ष्मण राक्षसांना पाहून पळतात? रामायणाचा असा विपर्यास हिंदुस्थान सहन करणार नाही !-हिंदु जनजागृती समिती
रावणाचे महिमामंडन आणि प्रभु श्रीरामांचा अपमान करणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाविरोधात दादर, मुंबई येथे आंदोलन,आक्षेपार्ह दृश्ये हटवून चित्रपटाची पुनर्तपासणी करण्याची मागणी ! निशस्त्र रावण हजारोंशी लढतो; शस्त्रधारी श्रीराम-लक्ष्मण राक्षसांना पाहून पळतात? रामायणाचा असा विपर्यास हिंदुस्थान सहन करणार नाही !-हिंदु जनजागृती समिती
मुंबई प्रतिनिधी- नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ चित्रपटात मूळ रामायणातील प्रसंगांचा विपर्यास करून रावणाचे उदात्तीकरण करण्यात आले आहे, तर प्रभु श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या आदर्श व्यक्तिरेखांचे अवमूल्यन करण्यात आले आहे. कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या रामायणाची अशा प्रकारे मोडतोड करून त्यातून विशिष्ट वैचारिक अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न हिंदू समाज कदापि सहन करणार नाही. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये आणि संवाद तातडीने हटवावेत, तसेच आगामी भाग प्रदर्शित करण्यापूर्वी त्याचे संत, रामायणाचे अभ्यासक आणि धर्मशास्त्रांच्या जाणकारांसमोर परीक्षण करावे, या मागण्यांसाठी २० नोव्हेंबरला दादर रेल्वे स्थानकाबाहेर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी नागरिक आणि रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाला यासंदर्भात देण्यात येणाऱ्या निवेदनावर मोठ्या संख्येने नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून निवेदनातील मागण्यांना पाठिंबा दर्शविला. याप्रकारेच कोल्हापुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथेही आंदोलन करण्यात आले.
चित्रपटातील काही दृश्ये पाहिल्यावर हा रामायणाचा चित्रपट आहे की रावणाचे उदात्तीकरण करणारी कथा, असा प्रश्न पडतो ! चित्रपटात अस्त्रशस्त्रांनी सज्ज असलेले प्रभु श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता राक्षसांना पाहून पळ काढत असल्याचे दाखवण्यात आले आहे; तर दुसरीकडे निशस्त्र रावण हजारो सैनिकांशी एकटाच लढून त्यांचा वध करत असल्याचे चित्रण करण्यात आले आहे. गरिबांना सोन्याची घरे देणारा आणि शोषितांचा तारणहार म्हणून रावणाची प्रतिमा उभी केली आहे. शूर्पणखेचा पती विद्युत्जिव्ह याची एका दासीची छेड काढल्यामुळे हत्या करणारा रावण महिलांचा रक्षक असल्याचे दाखवण्यात आले आहे; मात्र त्यानेच माता सीतेचे अपहरण केल्याचे वास्तव दुर्लक्षित केले आहे.
शूर्पणखेच्या प्रसंगात लक्ष्मणाने तिचे नाक कापल्यावर माता सीता लक्ष्मणाला ‘एका स्त्रीच्या रूपाचा भंग करण्याचा तुम्हाला अधिकार नाही’, अशा आशयाचे बोल सुनावतात, असे दाखवले आहे. प्रभु श्रीराम खर-दूषण यांच्याजवळ लक्ष्मणाच्या कृतीविषयी क्षमायाचना करतात, असेही चित्रण आहे. लक्ष्मणाला उद्धट, उपरोधिक आणि ज्येष्ठांचा अनादर करणारे दाखवले आहे. माता सीता राक्षसांशी युद्ध करतांना दाखवल्या आहेत; मात्र रावण अपहरण करतांना त्या प्रतिकार करत नाहीत. अशा अनेक प्रसंगांमधून मूळ रामायणातील कथन आणि व्यक्तिरेखांशी विसंगत चित्र उभे करण्यात आले आहे. हा केवळ कल्पनाविलास नसून रामायणातील आदर्शांचे विकृतीकरण आहे.
सेंसर बोर्ड चित्रपट प्रमाणन मंडळाने या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष कसे केले? भारतीय सिनेमॅटोग्राफ अधिनियम, १९५२ आणि केंद्र शासनाच्या चित्रपट प्रमाणन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये धार्मिक समूहांचा अवमान करणाऱ्या तसेच महिलांचे अवमूल्यन करणाऱ्या दृश्यांबाबत स्पष्ट निकष आहेत. असे असतांना या चित्रपटाला प्रमाणपत्र देतांना संबंधित निकषांचा विचार झाला का, याचे उत्तर केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने दिले पाहिजे. अन्य धर्मांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या चित्रपटांच्या विरोधाची दखल घेतली जाते; मग हिंदूंच्या श्रद्धांचा विषय आल्यावरच प्रमाणन मंडळाची भूमिका उदासीन का असते? या प्रकरणात मंडळाने चित्रपटाचे पुनर्परीक्षण करून आपली भूमिका स्पष्ट करावी.
रामायण हा मनोरंजनासाठी मनमानी बदल करण्याचा विषय नाही. प्रभु श्रीरामांचा पराक्रम कमी लेखून रावणाला महान ठरवण्याचा आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे अवमूल्यन करण्याचा प्रयत्न हिंदू समाज सहन करणार नाही. चित्रपट निर्माते आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.डॉ. उदय धुरी,प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती