पीएम-सेतू योजनेमुळे आयटीआयचे रूप पालटणार सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत ७२३ कोटींची गुंतवणूकः ३६ नवीन व्यवसाय सुरू होणार, १२० व्यवसायांचे आधुनिकीकरण होणार
पीएम-सेतू योजनेमुळे आयटीआयचे रूप पालटणार सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत ७२३ कोटींची गुंतवणूकः ३६ नवीन व्यवसाय सुरू होणार, १२० व्यवसायांचे आधुनिकीकरण होणार
राज्य प्रतिनिधी-औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा (आयटीआय) चेहरामोहरा बदलून त्याना आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगांच्या गरजा आणि रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाशी जोडणारी केंद्र शासनाची महत्वाकांक्षी प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन यू अपग्रेडेड आयटीआय (PM-SETU) योजना महाराष्ट्रात प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या योजनेंतर्गत सातारा. सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी २४१ कोटी रुपये, अशा एकूण ७२३ कोटी रुपयांची गुंतवणूक पुढील पाच वर्षात करण्यात येणार आहे. या माध्यमातून आयटीआयचे आधुनिकीकरण, नवीन व्यवसायांची सुरुवात, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि कुशल मनुष्यबळ निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सयाजी हॉटेल, शिरवळ, जि. सातारा येथे सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील नामांकित औद्योगिक आस्थापना, उद्योजक, व्यावसायिक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच आयटीआयचे प्राचार्य यांच्या उपस्थितीत एकदिवसीय इंडस्ट्री मीट आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्योगजगताकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबईचे संचालक सतीश सूर्यवंशी, उपसंचालक रमण पाटील, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, पुणेचे सहसंचालक सचिन धुमाळ यांच्यासह तिन्ही जिल्ह्यांचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, आयटीआयचे प्राचार्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
७२३ कोटींच्या निधीतून आयटीआयचे आधुनिकीकरणपीएम-सेतू योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी मंजूर होणाऱ्या २४१ कोटी रुपयांमध्ये केंद्र शासनाचा ५० टक्के म्हणजे १२०.५० कोटी रुपये, राज्य शासनाचा ३३ टक्के म्हणजे ७९.५० कोटी रुपये, तर उद्योग क्षेत्राचा १७ टक्के म्हणजे सुमारे ४१ कोटी रुपयांचा सहभाग असणार आहे. या निधीतून उद्योगांच्या सल्ल्याने व आवश्यकतेनुसार नवीन मशिनरी, उपकरणे, आधुनिक कार्यशाळा, प्रशिक्षण सुविधा आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात सातारा आयटीआय हे हब आयटीआय म्हणून कार्य करणार असून वाई, मेढा, कोरेगाव आणि औंध-खटाव येथील आयटीआय स्पोक आयटीआय म्हणून जोडले जाणार आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतही प्रत्येकी एक हब आयटीआय आणि चार स्पोक आयटीआय अशा पद्धतीने क्लस्टर विकसित करण्यात येणार आहेत.
उद्द्योगांच्या मागणीचा विचार करून प्रत्येक जिल्ह्यातील हब संस्थेमध्ये चार नवीन व्यवसाय, तर स्पोक संस्थांमध्ये प्रत्येकी दोन नवीन व्यवसाय सुरु करण्याचे नियोजन आहे. यानुसार तिन्ही जिल्ह्यांमध्ये एकूण ३६ नवीन व्यवसाय सुरू होणार असून १२० विद्यमान व्यवसायांचे आधुनिकीकरण व अद्ययावतीकरण करण्यात येणार आहेत.
रोबोटिक्स, ड्रोन, ईव्ही, सोलार आणि इंडस्ट्री ५.० वर भर,बदलत्या औद्योगिक क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन रोबोटिक्स, ड्रोन, इलेक्ट्रिक व्हेईकल, सोलार तंत्रज्ञान आणि इंडस्ट्री ५.० यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबतच इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, मशीनिस्ट, वेल्डर, पेंटर यांसारख्या पारंपरिक व्यवसायांचेही आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षण केवळ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित राहणार नसून शिक्षक, निदेशक, कार्यालयीन कर्मचारी, प्राचार्य आणि वरिष्ठ अधिकारी यांनाही आधुनिक तंत्रज्ञान व उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार प्रशिक्षित केले जाणार आहे
प्रत्येक आयटीआयमध्ये प्रोडक्शन सेंटरची निर्मिती,प्रत्येक आयटीआयमध्ये स्वतंत्र प्रोडक्शन सेंटर स्थापन करून या केंद्रांमध्ये विविध औद्योगिक उत्पादनांसाठी लागणारे सुटे भाग, शासकीय कार्यालयांसाठी आवश्यक फर्निचर, कुलर्स, वेल्डिंगशी संबंधित उत्पादने आदींचे उत्पादन करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यकतेनुसार तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल. तज्ज्ञ, आयटीआय कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांच्या सहभागातून संस्थेची जागा, कार्यशाळा, मशिनरी, वीज आणि पाणी या सुविधांचा वापर करून उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजना (POTS) राबविण्यात येणार आहे. मुळे प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेचा अनुभव मिळेल, त्यांच्या कौशल्यात वाढ होईल, त्यांना आर्थिक लाभ मिळण्याची संधी उपलब्ध होईल आणि संस्थेलाही महसूल प्राप्त होऊ शकेल. अशा प्रकारे आयटीआय केवळ प्रशिक्षण संस्था न राहता उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ आणि उत्पादन सेवा पुरविणारी केंद्रे बनतील.महाराष्ट्रात ४२० शासकीय आयटीआयमध्ये योजना राबविण्याचे उद्दिष्ट कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संचालक श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यासाठी बीव्हीजी ग्रुप. छत्रपती संभाजीनगरसाठी बेलराईज इंडस्ट्रीज आणि नागपूरसाठी मॉईल (MOIL) या उद्योगसमूहांनी योजनेतील सहभाग निश्चित केला असून अनुक्रमे ४९ कोटी, ४७ कोटी आणि ५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे. शासनाकडूनही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या सांगली, सातारा, कोल्हापूर, पनवेल, नागपूर, गडचिरोली, नागोठणे आणि ठाणे या ठिकाणी या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करण्याचे नियोजन आहे. टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रातील सर्व ४२० शासकीय आयटीआयमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक आयटीआयचे जाळे असून ४२० शासकीय आणि सुमारे ६०० खासगी आयटीआय कार्यरत आहेत. राज्यातील ४२० शासकीय आयटीआयचे ८४ क्लस्टर तयार करून प्रत्येक क्लस्टरसाठी २४९ कोटी रुपये याप्रमाणे सुमारे २०,२४४ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे नियोजन आहे.
नामांकित उद्द्योगसमूहांचा सहभाग,या इंडस्ट्री मीटमध्ये चितळे उद्योग समूह, समृद्धी इंडस्ट्रीज यांच्यासह गरवारे, किर्लोस्कर, गोदरेज समूह, टाटा कमिन्स, विप्रो, पारी, विलो माथर प्लांट, एसीजी कॅप्सूल, केएसबी, निप्रो, इनोक्सपा, रिएटर इंडिया लिमिटेड, एशियन पेंट्स लिमिटेड, ट्यूब इन्व्हेस्टमेंट, डेलवाल फ्लो कंट्रोल लिमिटेड, अल्फा लेवल इंडिया लिमिटेड, महाबळ मेटल्स, महाबळ ग्रुप, किर्लोस्कर ऑइल इंजिन, श्री इंडस्ट्रीज, एस. बी. रिसेलर्स आदी नामांकित औद्योगिक आस्थापनांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
एकंदरीत, पीएम-सेतू योजना ही केवळ आयटीआयच्या इमारती, मशिनरी किंवा सुविधांचे आधुनिकीकरण करणारी योजना नसून शिक्षण, उद्योग आणि रोजगार यांच्यातील दरी कमी करणारी परिवर्तनशील योजना ठरणार आहे. उद्द्योगांच्या प्रत्यक्ष सहभागातून कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन ग्रामीण व शहरी युवकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.