ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी दुहेरी सुविधा नवे एस्केलेटर आणि मोफत शौचालयाचे गुरुवारी लोकार्पण खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश ..
ठाणे – प्रतिनिधी- ठाणे रेल्वे स्थानकातील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी दोन महत्त्वपूर्ण सुविधांची भर पडली आहे. फलाट क्रमांक ५ आणि ६ वरील प्रवाशांसाठी सीएसएमटी दिशेकडील एफओबी क्रमांक १ येथे नवीन सरकता जिना (एस्केलेटर) उभारण्यात आला असून, फलाट क्रमांक २ येथे डी मार्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून नवीन शौचालय ब्लॉकची निर्मिती करण्यात आली आहे. या दोन्ही सुविधांचा लोकार्पण सोहळा गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २०२३ पासून डी मार्ट फाऊंडेशन आणि मध्य रेल्वे संयुक्तपणे काम करीत आहेत. या उपक्रमांतर्गत सीएसएमटी, भायखळा, घाटकोपर आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर यापूर्वीच नवीन शौचालय ब्लॉक प्रवाशांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहेत. याच उपक्रमाचा विस्तार आता ठाणे रेल्वे स्थानकात करण्यात येत आहे.
या प्रकल्पांतर्गत जुन्या शौचालय ब्लॉकचे नूतनीकरण करण्याऐवजी ते हटवून डी मार्ट फाऊंडेशनकडून नवीन शौचालय ब्लॉक उभारण्यात येत आहेत. या सुविधेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे २४ तास स्वच्छता कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. प्रवाशांना या शौचालयांचा वापर पूर्णपणे निःशुल्क करता येणार आहे. शौचालयांसाठी आवश्यक पाणीपुरवठा, वीजपुरवठा तसेच ड्रेनेज आणि स्वच्छतेशी संबंधित देखभालीची जबाबदारी मध्य रेल्वे प्रशासनाकडे असणार आहे.
दरम्यान, ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ५ आणि ६ साठी उभारण्यात आलेला नवीन एस्केलेटर प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सीएसएमटी दिशेकडील एफओबी क्रमांक १ येथे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एस्केलेटरची उभारणी करताना अस्तित्वातील जिन्याला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. जुन्या जिन्याच्या दोन्ही बाजूंना डेकची व्यवस्था करण्यात आली असून, प्रवाशांना नवीन एस्केलेटरसह जुन्या जिन्याचाही वापर करता येणार आहे.
ठाणे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी उपनगरीय लोकल, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांनी प्रवास करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत फलाटांवर होणारी प्रवाशांची कोंडी कमी करण्यासाठी हा एस्केलेटर उपयुक्त ठरणार आहे.
डी मार्ट फाऊंडेशनच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून उभारण्यात आलेली मोफत शौचालय सुविधा आणि मध्य रेल्वेच्या माध्यमातून उपलब्ध झालेला नवीन सरकता जिना यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवासी सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण वाढ होणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, स्वच्छ आणि आरामदायी करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.