vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दुष्काळी संकटात राज्य शासनाची साथ;पाच हजारांच्या मदतीने बळीराजाला दिलासा

दुष्काळी संकटात राज्य शासनाची साथ;पाच हजारांच्या मदतीने बळीराजाला दिलासा

 सांगली, प्रतिनिधी: यंदाच्या खरीप हंगामात पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच शासनाच्या मदतीचा दिलासा मिळू लागला आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जमा होण्यास सुरुवात झाली असून, रक्कम जमा झाल्याचे संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर धडकत आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याच्या प्रतिकूल परिस्थितीतील शेतकऱ्यांसाठी ही मदत दिवाळीच्या सणात दिलासा देणारी ठरत आहे.

 शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी कुटुंबांच्या सणासुदीच्या खर्चाला हातभार लागणार असून, शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

 मिरज तालुक्यातील तानंग येथील बाबासाहेब चौगुले यांची गट क्रमांक 3 आणि 10 मध्ये शेती आहे. दरवर्षी ते सोयाबीन आणि चारा पिकांची लागवड करतात. मात्र, यंदा पावसाअभावी सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाया गेले. मात्र, दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची मदत मिळाल्याने शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. शेतकरी हा सर्वसामान्य ग्राहक असल्याने तो बाजारपेठेतून खरेदी करतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा आल्याने त्यांच्याबरोबरच फेरीवाले, छोटे व्यावसायिक आणि गोरगरीब जनतेचीही दिवाळी आनंदात साजरी होण्यास मदत होईल, अशी भावना चौगुले यांनी व्यक्त केली.‘दुष्काळाच्या संकटात शासनाची मदत मोलाची’ मिरज तालुक्यातील सावळी येथील अमर संभाजी नाईक यांची खंडेराजुरी येथे साडेतीन एकर शेती आहे. गट क्रमांक 84 मध्ये त्यांनी उडीद पेरले होते. मात्र, पावसाअभावी पिकाचे मोठे नुकसान झाले. सावळी येथील रोहित पाटील यांनीही दोन एकर क्षेत्रात उडीद पेरले होते. दुष्काळामुळे पीक पूर्णपणे वाया गेले. मिरज तालुक्यातील सलगरे येथील सतीश माळी यांनीही पावसाअभावी अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत शासनाकडून पाच हजार रुपयांची मदत खात्यावर जमा झाल्याने दिवाळीसाठी मोठा आधार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

‘पीक गेले, पण शासनाच्या मदतीने आशेचा किरण’ जत तालुक्यातील खैराव येथील जगन्नाथ दादासो घुटकूडे यांनी पेरणी करूनही पिकातून काहीच उत्पन्न मिळाले नसल्याची व्यथा मांडली. संपूर्ण पीक वाया गेल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. जत तालुक्यातीलच शेगाव येथील राकेश नाईक यांची दोन हेक्टर जमीन आहे. त्यांनी लागवड केलेल्या मका पिकाचे पाऊस न पडल्यामुळे नुकसान झालेले आहे. मात्र, शासनाने व शासकीय यंत्रणांनी पंचनामा केल्यानंतर त्यांच्या खात्यात पाच हजार रूपये जमा झाले. कठीण परिस्थितीत महाराष्ट्र शासनाची ही मदत दिल्याने दिलासा मिळाला असून, शासन आणि संबंधित महसूल यंत्रणेचे त्यांनी आभार मानले.

 कवठेमहांकाळ तालुक्यातील म्हैसाळ येथील प्रवीण दादासाहेब पाटील यांच्या शेतीचेही पावसाअभावी नुकसान झाले होते. त्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाल्याचा संदेश प्राप्त झाल्याने त्यांनी शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. करोली टी येथील विनोद प्रभू कोष्टी यांची तीन एकर शेती असून, संपूर्ण क्षेत्रात त्यांनी मका लागवड केली होती. दुष्काळामुळे पिकाचे पूर्ण नुकसान झाले. मात्र, सकाळीच खात्यावर पाच हजार रुपये जमा झाल्याचा संदेश मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. शिराळा तालुक्यातील पाचुंब्री येथील उमेश मारुती पाटील यांच्या शेतातील भुईमूग आणि सोयाबीन पिके पावसाअभावी पूर्णपणे वाया गेली. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर संबंधित यंत्रणांनी वेगाने पंचनामे पूर्ण केले. त्यामुळे दिवाळीपूर्वीच पाच हजार रुपये खात्यात जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आणि संबंधित सर्व यंत्रणांचे त्यांनी आभार मानले. कडेगाव तालुक्यातील तडसरचे संजय पवार यांच्या खात्यात दोन दिवसांपूर्वी 5 हजार रूपये जमा झाली आहे. त्याबद्दल शासन हे शेतकरी हिताचं असल्याची भावना व्यक्त करून त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत. कडेगाव तालुक्यातील हणमंतवडिये येथील आशा प्रताप मोरे यांनी अशा मदतीबद्दल शासनाचे व यंत्रणांचे आभार मानले आहेत.

आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूर येथील दत्ता बाळ आणि खरसुंडी येथील अवधूत प्रमोद देशपांडे यांनाही पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जमा झाल्याचा संदेश प्राप्त झाला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम हातचा गेल्याचे दुःख शेतकऱ्यांच्या मनात असले, तरी ऐन दिवाळीच्या तोंडावर खात्यात जमा होणारी मदत त्यांच्या कुटुंबांसाठी दिलासादायक ठरत आहे. खात्यात पैसे जमा झाल्याचे संदेश मोबाईलवर प्राप्त होत असून, हे संदेश म्हणजे पिकांच्या नुकसानीने खचलेल्या शेतकऱ्यांना या मदतीने संकटाच्या काळात शासन आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास मिळाला आहे.

०००००

संबंधित पोस्ट

रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत सन्मान व समारोप समारंभ संपन्न

आरोग्य शिक्षणासाठी प्रभावी माहिती, शिक्षण व संवाद यंत्रणा अधिक सक्षम करा– आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी वारकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन 

आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन प्रणालीद्वारे

राऊळगाव दुर्घटनेतीन मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी ८२ लक्ष रुपयांची मदत – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जखमींना २५ लक्ष रुपये देण्याचे निर्देश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

नागपूर कृषी उत्पन्न बाजाराला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्वीकारला पदभार