भटक्या-विमुक्त जमातीतील मुला-मुलींनी शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात यावे – मंत्री संजय राठोड,कांचनवाडी परिसरातील भटक्या-विमुक्त समाजाच्या वस्त्यांना भेट; समाजबांधवांच्या समस्या जाणून घेतल्या
भटक्या-विमुक्त जमातीतील मुला-मुलींनी शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात यावे – मंत्री संजय राठोड,कांचनवाडी परिसरातील भटक्या-विमुक्त समाजाच्या वस्त्यांना भेट; समाजबांधवांच्या समस्या जाणून घेतल्या
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- भटक्या-विमुक्त जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजातील मुला-मुलींनी शिक्षणाच्या संधींचा लाभ घेऊन प्रगती साधावी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.
येथील कांचनवाडी परिसरातील भटक्या-विमुक्त समाजाच्या वस्त्यांना मंत्री राठोड यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी समाजबांधवांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेतल्या.या भेटीदरम्यान समाजातील नागरिकांना भेडसावणाऱ्या जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, जन्मदाखले, निवास, शिक्षण तसेच रोजगारासंबंधीच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आवश्यक शासकीय कागदपत्रांच्या उपलब्धतेसह शिक्षण व रोजगाराच्या संधी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मंत्री राठोड यांनी सांगितले.भटक्या-विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी शासन प्रयत्नशील असून समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाऊबीजेच्या निमित्ताने मंत्री राठोड यांच्या हस्ते समाजातील महिलांना शिधावाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी कलोसे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राजपाल राठोड, महादेव चव्हाण, जगन बाबर, परमेश्वर जाधव यांच्यासह भटक्या-विमुक्त जमातींच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व समाजबांधव उपस्थित होते.